अमळनेर (प्रतिनिधी) नगरपरिषद मधील लोकनियुक्त नगराध्यक्षा पुष्पलता पाटील, नगरसेवक व नगरसेविका यांची नियोजित सभा संपन्न होऊन त्यात ठराव क्रमांक १४ मध्ये नगरपरिषदेच्या भव्य सभागृहाला महात्मा जोतिबा फुले यांचे नाव देण्याचा ठराव नगराध्यक्षा सौ.पुष्पलता साहेबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली सर्व नगरसेवक, नगरसेविका इतर अधिकारी यांच्या उपस्थितीत सर्वानुमते संमत झाला आहे. यावेळी फुलें प्रेमी नागरिकांतर्फे नगरसेवक अँड. सुरेश सोनवणे शिक्षण सभापती रत्नमाला साखरलाल माळी, नगरसेवक देविदास भगवान महाजन, नगरसेविका रत्ना महाजन, ज्योती महाजन आदींनी संपूर्ण सभागृहाचे आभार मानले.
नगराध्यक्षा पुष्पलता पाटील व माजी आमदार कृषिभूषण साहेबराव पाटील यांना क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती दिनी क्रांतीसुर्य महात्मा फुले विचार मंच, माळी महासंघ व सामाजिक संघटनांतर्फे सदर निवेदन देण्यात आले होते. त्यावेळी त्यांनी नामकरण व भव्य फुले स्मारक उभारण्याचे आश्वासन दिले होते, ते आता पूर्णत्वास येत आहे. दिलेल्या मागणी निवेदनाचा सन्मान राखून नगराध्यक्षा व संपूर्ण नगरसेवक व नगरसेविका यांनी भव्य न.पा.सभागृहाला क्रांतीसुर्य महात्मा जोतिबा फुले यांचे नाव देऊन समस्त फुले प्रेमींचा बहुजनांचा सन्मान या माध्यमातून राखला आहे. तसेच फुले दाम्पत्यांचे भव्य स्मारक शहरात लवकरच उभारण्यात येणार आहे. या ठरावाबद्दल विचार मंच संस्थापक अध्यक्ष व महाराष्ट्र माळी समाज महासंघाचे प्रदेश संघटक प्रवीण बी.महाजन यांनी साहेबराव पाटील यांची भेट आभार मानले आहेत. यावेळी महाराष्ट्र माळी समाज महासंघ तालुक्यातील पदाधिकारी ओबीसी शिक्षक पालक असोसिएशन व विविध सामाजिक संघटना पदाधिकारी, समस्त फुले प्रेमीं कडूनही निर्णयाचे स्वागत करण्यात आले आहे.