बहिण-भावाच्या रशियातील दुर्घटनेतल्या मृत्यूने अमळनेरवर शोककळा !

अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील दोन विद्यार्थ्यांचा रशियामध्ये नदीत पोहतांना बुडून मृत्यू झाल्याने परिसरावर शोककळा पसरली आहे. विशेष म्हणजे हे दोन्ही आते-मामे भावंड आहेत.

या संदर्भातील माहिती अशी की, रशियातील वोल्खोव्ह नदीत बुडुन चार विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला असून यातील तिघे हे जळगाव जिल्ह्यातील आहेत. भारतीय वेळेनुसार मंगळवारी रात्री अकरा वाजेच्या सुमारास ही दुर्घटना घडली. जिया पिंजारी, जिशान पिंजारी आणि हर्षल देसले हे तीन विद्यार्थी नदीत पोहत असतांना जोरदार लाट आल्यामुळे बुडून मृत्यूमुखी पडले. यातील जिशान अशफाक पिंजारी याची जिया फिरोज पिंजारी ही आतेबहिण आहे. हे दोन्ही अमळनेर येथील रहिवासी आहेत.

दरम्यान, मृत्यूच्या आधी काही मिनिटांपूर्वीच जिशान पिंजारी याने व्हाटसअपवर व्हिडीओ कॉल करून आईशी संपर्क साधला होता. याप्रसंगी त्यांच्या आईने लवकर पाण्यातून बाहेर पडण्याचे सांगितले. मात्र काही मिनिटात मोठी लाट आल्याने चौघे जण वाहून गेले. यातील हर्षल देसले या भडगाव तालुक्यातील विद्यार्थ्याचा मृतदेह आढळला असून उर्वरित तिघांच्या पार्थिवाचा शोध सुरू आहे. तर, जिया आणि जिशानच्या दुर्घटनेतील मृत्यूमुळे अमळनेरवर शोककळा पसरली आहे.

Protected Content