अमळनेर, प्रतिनिधी | येथील एस.टी. डेपोतील इंदौरला जाणारी बस आज (दि.३१) शिंदखेड़ा तालुक्यातील बेटावदजवळ चालकाच्या हलगर्जीपणामूळे रस्त्याचा कडेला उतरल्याने खड्ड्यात मातीत फसली होती. बसमध्ये ४० प्रवासी होते, सुदैवाने कुणालाही इजा झाली नाही.
अधिक माहिती अशी की, बेटावदपासून काही अंतरावर टॉवरजवळ अमळनेर-इंदौर ही बस (क्र.एम.एच. २०, बी.एल. २४०४) रस्त्यावर पिवळ्या मातीचा निकृष्ट भराव करण्यात आल्यामुळे चालकाच्या बाजूने रस्त्याखाली उतरून चिखलात फसली. यावेळी बस भरावाखाली ३ ते ४ चार फुट खोल खड्ड्यात उतरल्याने प्रवाशांत घबराट निर्माण झालेली होती. मात्र सुदैवाने या अपघातात एकाही प्रवाशाला काहीच इजा झाली नाही. घटनास्थळी शिंदखेडा व अमळनेर आगाराचे वरिष्ठ अधिकारी तत्काळ दाखल झाले, त्यांनी प्रवाशांना दुसऱ्या बसेसमध्ये बसवून अपघातग्रस्त बसला बाहेर काढण्यासाठी व्यवस्था केली. नशीब बलवत्तर म्हणून बस् उलटली नाही, अन्यथा मोठी दुर्घटना घडली असती.