अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील एकतास येथे ट्रान्सफॉर्मर वरील शॉक सर्किटने तीन बिघे मका खाक झाला असून तब्बल ५ लाखांचे नुकसान झाले आहे.
अमळनेर तालुक्यातील एकतास येथील प्रभाकर राजाराम पाटील यांचे एकलहरे शिवारात पाडसे रेल्वेस्टेशन जवळ गट नं ६९ क्षेत्र १ हेक्टर २७ आर म्हणजे ३ बिघे शेत आहे. त्यात त्यांनी रब्बी मका लावलेला होता. येथे मंगळवारी दुपारी एक वाजेच्या सुमारास आग लागली. विशेष म्हणजे कापून पडलेला मका काढणी करण्यापूर्वीच त्यांच्या शेतात शॉक सर्किटने आगीचा गोळा पडून सुकलेला मकाच्या पूर्ण शेतात आग पसरली व संपूर्ण शेताने पेट घेतला व शेत आगीच्या भक्ष्यस्थानी आले.
या दुर्घटनेमध्ये दोन लाख रुपयांचा १६ एम एम आकाराचा ठिबक सिंचन संच, पाईप लाईन, मक्याचे कणसे, चारा असा जवळपास ८० क्विंटल येणारा मका जळून खाक झाला आहे. त्यात एकत्रीतपणे जवळपास पाच लाख रुपयांचे नुकसान झाले. शेतात काम करण्यासाठी तीन वाजेच्या सुमारास सालदार शेतात गेले असतांना शेत जळून खाक झाल्याचे त्यांना दिसल्यावर त्यांनी प्रभाकर पाटील यांना ही माहिती दिली. लागलेल्या आगीबाबत प्रभाकर पाटील यांनी संबंधित माहिती वीज कंपनीला दिली. त्यानंतर कळमसरे कक्षाचे अभियंता किशोर सुर्वे यांनी शेताची पाहणी करून सर्व माहिती घेतली.