अमळनेर प्रतिनिधी | यंदा ऑगस्ट महिना अर्धा झाला तरी समाधानकारक पाऊस न झाल्यामुळे खान्देशात दुष्काळ जाहीर करण्याची मागणी आमदार अनिल भाईदास पाटील यांनी केली आहे. मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांना भेटल्यानंतर निवेदनाच्या माध्यमातून त्यांनी यासाठी साकडे घातले.
अमळनेर विधानसभा मतदारसंघासह संपूर्ण खान्देशात यंदा वार्षिक सरासरीच्या २५% पेक्षा कमी पर्जन्यमान झाले असुन,श्रावणात देखील सगळीकडे कोरडच असल्याने पिकांची आशा जवळपास संपली आहे. अश्या कठीण परिस्थितीत शेतकरी राजाच्या वेदना पाहणे असह्य झाल्याने अमळनेर विधानसभा मतदारसंघाचे आमदार अनिल पाटील यांनी तातडीने मुंबई गाठून मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी पोहोचले. यावेळी कोणत्याही परिस्थितीत खान्देशात दुष्काळ जाहीर करावा अशी विनंती त्यांनी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांचेकडे केली.
वर्षा या शासकीय निवासस्थानी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री ना.उध्दव ठाकरे व उपमुख्यमंत्री ना.अजित दादा पवार या दोघांचीही भेट घेतली. याप्रसंगी केवळ माझा अमळनेर मतदारसंघच नव्हे तर संपुर्ण खानदेशातील जळगाव,धुळे व नंदुरबार जिल्ह्याच्या वतीने दुष्काळामुळे पीडित झालेल्या माझ्या शेतकरी बांधवांच्या व्यथा मांडण्यासाठी मी या ठिकाणी आलो असून माझा बळीराजा खूपच खचलाय. एकवेळा काय दुबार काय आणि तिबार काय पेरणीचे सारेच प्रयत्न फोल ठरले असून पिकांची आशा तर जवळपास संपलीच आहे, शेतकर्यांनी आता आशा सोडली आहे,आता पुढे काय? हा एकच प्रश्न प्रत्येकासमोर असून अश्या कठीण परिस्थितीत आपले महाविकास आघाडी सरकार आपल्या पाठीशी ठाम उभे राहिल ही आस सार्या शेतकरी बांधवाना आहे.
या बाबींचा विचार करता, खान्देशातील शेतकर्यांचा एक प्रतिनिधी आणि शेतकरी पुत्र म्हणून मी आपणास विनंती करतो की पूर्णपणे खचलेल्या आमच्या बळीराजास हेक्टरी २५,०००/- रुपये सरसकट विनाअट सानुग्रह अनुदान जाहीर करा,शेतीपंपाचे चालू वर्षाचे विज बिल माफ करा,गावोगावी गुरांसाठी चारा छावण्या सुरू करा,याव्यतिरिक्त जे जे करण्याजोगे असेल ते ते करा पण बळीराजाला धीर द्या अश्या मागण्या आमदारांनी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्याकडे केल्यात,व सदर मागण्यांचे लेखी निवेदन देखील आमदार अनिल पाटलांनी सादर केले.याप्रसंगी राज्याचे गृहमंत्री ना.दिलीपराव वळसे-पाटील देखील उपस्थित होते.
दरम्यान मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी देखील त्यांचे संपुर्ण म्हणणे काळजीने ऐकून घेत घाबरू नका महाविकास आघाडी सरकार या भूमातेच्या सुपूत्रांचे असल्याने शेतकर्यांच्या मागे हे सरकार ठाम उभे राहणार असून यात खान्देशचा विशेष प्राधान्याने विचार होईल आणि पूर्णपणे न्याय देण्याचा प्रयत्न होईल अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी आमदार पाटील यांना दिली.