यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | यावल तालुक्यातील सातपुड्याच्या पायथ्याशी वसलेल्या आदिवासी पाडा असलेल्या श्रीक्षेत्र डोंगरदा येथे दिनांक २२ मार्च, शनिवारी डोंगर कठोरा येथील अच्युत धनाजी चौधरी विद्यालयाच्या १९९६-९७ बॅचच्या विद्यार्थ्यांचा स्नेहमिलन सोहळा तब्बल २८ वर्षांनी मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमात शालेय जीवनाच्या आठवणींना उजाळा देत आनंदोत्सव साजरा करण्यात आला. या सोहळ्यात श्रीक्षेत्र डोंगरदा येथील आदिवासी पाड्यावरील मुला-मुलींना बिस्किट आणि नाश्ता वाटप करण्यात आला. तसेच स्नेहभोजन, गप्पा-गोष्टी, गाणी गात जुन्या आठवणींना उजाळा देण्यात आला. २८ वर्षांनी सर्व विद्यार्थी एकत्र आल्याने वातावरण भावनिक झाले होते.
येथील अच्युत धनाजी चौधरी विद्यालयाच्या १९९६-९७ बॅचच्या विद्यार्थ्यांनी मुख्याध्यापक नितीन झांबरे, उपशिक्षक पी.पी. कुयटे, एन.व्ही. वळींकार, सोनाली फेगडे, मनीषा तडवी, शुभांगीनी नारखेडे यांना आपल्या भेटी देत आशीर्वाद घेतले. कार्यक्रमाच्या प्रारंभी मयत शिक्षकवृंदांना श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यानंतर विद्यार्थ्यांनी आपला परिचय देत, सध्या करीत असलेल्या व्यवसाय वा नोकरीची माहिती दिली. याप्रसंगी डॉ. चंदन राणे यांनी आपल्या मधुर आवाजात गाणी सादर करत सर्वांचे मनोरंजन केले. तसेच आनंदवन दत्त मंदिर ट्रस्टचे संत श्री स्वरूपानंद महाराज यांनी शालेय जीवनातील अनुभव व आजच्या परिस्थितीतील फरक स्पष्ट केला. विद्यार्थ्यांनी व्हॉट्सअप ग्रुप तयार करून परस्पर सहकार्य करण्याचा संकल्प सोहळ्यात करण्यात आला.
कार्यक्रमात गाण्यांच्या भेंड्या, संगीत खुर्ची, नाव जिंकणे असे खेळ खेळत आनंद साजरा करण्यात आला. संपूर्ण कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी तुषार पाटील, लीना राणे, नयनश्री पाटील, शुभांगी पाटील, श्रीकांत झांबरे, श्रीकांत भिरुड, युवराज भिरुड, अशोक तायडे, राजेंद्र पारधे, प्रसाद आढाळे, सुरेश सपकाळे, महेश भिरुड, गणेश दांडगे, गणेश जावळे, शारदा बाविस्कर, कांचन भिरुड, बिस्मिल्ला तडवी, किताब तडवी, रमजान तडवी, शेखलाल तडवी, जुम्मा तडवी, सरवर तडवी आदींचे सहकार्य लाभले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राकेश गुरव यांनी केले, तर आभार कृषी अधिकारी श्रीकांत झांबरे यांनी मानले. समारोपानंतर खान्देशातील पारंपरिक जेवण – यावल तालुक्यातील प्रसिद्ध वांग्याची भाजी, वरण, भाजलेली लोळगे, आमसुलची कढी आणि भाताचा मनसोक्त आस्वाद सर्वांनी घेतला.