जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | लोकसभा निवडणुकांच्या चौथ्या टप्पासाठी उद्या मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे. एकूण पाच टप्प्यातील निवडणुकांपैकी राज्यात तीन टप्प्यातील मतदान झाले आहे. उदया १३ मे रोजी राज्यातील ११ लोकसभा मतदारसंघात मतदान होणार आहे. यात नंदुरबार, जळगाव, रावेर, जालना, छ.संभाजीनगर, मावळ, पुणे, शिरुर, अहमदनगर, शिर्डी आणि बीड मतदासंघाचा समोवश आहे. यासर्व मतदारसंघातील लढतीवर संपूर्ण राज्याची नजर आहे.
नंदूरबारमध्ये काँग्रेसने ॲड. गोवाल पाडवी यांना उमेदवारी दिली असून त्यांचा सामना महायुतीच्या सलग दोन टर्मच्या खासदार भाजप नेत्या डॉ. हिना गावित यांच्यासोबत होणार आहे. गोवाल पाडवी हे अक्कलकुवाचे आमदार केसी पाडवी यांचे पुत्र आहे, तर डॉ.हिना गावित या नंदूरबारचे आमदार विजयकुमार गावित यांच्या कन्या आहे. जळगावमध्ये भाजपमधून शिवसेना ठाकरे गटात आलेल्या करण पाटील-पवार यांचा सामना भाजपच्या स्मिता वाघ यांच्यासोबत होणार आहे. करण पाटील यांना जळगावचे माजी खासदार उन्मेष पाटील यांचा समर्थन प्राप्त आहे. उन्मेष पाटील हे करण पाटील यांच्यासोबतच ठाकरे गटात आले, तर स्मिता वाघ या भाजपच्या जुन्या कार्यकर्ता मानल्या जातात. रावेरमध्ये भाजपच्या दोन टर्मच्या खासदार रक्षा खडसे यांचा सामना राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार श्रीराम पाटील यांच्यासोबत होणार आहे. रक्षा खडसे या एकनाथराव खडसे यांच्या सून असून एकनाथ खडसे हे राष्ट्रवादी शरद पवार गट सोडून भाजपमध्ये जाणार आहे. मात्र त्यांच्या कन्या रोहिणी खडसे या शरद पवार गटात राहूनच श्रीराम पाटील यांचा प्रचार करत आहे.
जालनामध्ये भाजपचे मोठे नेते आणि मंत्री रावसाहेब दानवे यांचा सामना काँग्रेसचे कल्याण काळे यांच्यासोबत होणार आहे. छ.संभाजीनगरात दोन्ही शिवसेना आमने-सामने असून शिवसेना ठाकरे गटाकडून चंद्रकांत खैरे, शिवसेना शिंदे गटाकडून संदिपान भुमरे आणि एआयएमआयएम यांचे खासदार इम्तियाज जलील यांची तिरंगी लढत होणार आहे. मावळमध्येही दोन्ही शिवसेना आमने-सामने असून शिवसेना ठाकर गटाचे संजोग वाघेरे यांचा सामना शिवसेना शिंदे गटाकडून श्रीरंग बारणे यांच्यासोबत होणार आहे. पुण्यामध्ये काँग्रेसकडून कसबा पेठचे आमदार रवींद्र धंगेकर, भाजपकडून मुरलीधर मोहोळ तर मनसे सोडून वंचितमध्ये आलेले वसंत मोरे यांची तिरंगी लढत होणार आहे. शिरूरमध्ये दोन्ही राष्ट्रवादी आमने-सामने असून राष्ट्रवादी शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे यांचा सामना शिंदे गटातून राष्ट्रवादी अजित पवार गटात आलेले सलग तीन वेळा खासदार असलेले शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यासोबत होणार आहे. अहमदनगरमध्ये भाजपचे डॉ. सुजय विखे पाटील यांचा सामना पारनेरचे माजी आमदार राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नीलेश लंके यांच्यासोबत होणार आहे. शिर्डीमध्येही दोन्ही शिवसेना आमने-सामने असून शिवसेना ठाकरे गटाचे भाऊसाहेब वाकचौरे यांचा सामना शिवसेना शिंदे गटाचे सदाशिव लोखंडे तर वंचित बहुजन आघाडीने कॉंग्रेसमधून आलेल्या उत्कर्षा रुपवते यांची तिरंगी लढत होणार आहे. बीडमध्ये भाजपच्या पंकजा मुडे यांचा सामना राष्ट्रवादी शरद पवार गटाचे बजरंग सोनवणे यांच्यासोबत होणार आहे.