मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । मुक्ताईनगर मतदारसंघातील मुक्ताईनगर, रावेर, बोदवड तालुक्यातील अनेक ग्रामपंचायतींना पंधराव्या वित्त आयोगाचा निधी वितरित करण्यात आलेला नाही, अशा निधीपासून वंचित ग्रामपंचायतींना तात्काळ निधी वितरित करण्यात यावा, अशी मागणी राष्ट्रवादी महिला काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांनी जळगाव जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.अंकित यांचेकडे निवेदनाद्वारे केली आहे.
दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, ग्रामिण विकासाचा मानबिंदू असलेल्या ग्रामपंचायत ना “ग्राम संसद” म्हणून ओळखले जाते. ग्रामिण भागातील नागरिकांना उत्तम दर्जाच्या पायाभूत सुविधा उपलब्ध व्हाव्या यासाठी शासनातर्फे ग्रामपंचायतीना गावात पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी १५व्या वित्त आयोगातून निधी उपलब्ध करून दिला जातो. यामध्ये 80 टक्के निधी थेट ग्रामपंचायतीना मिळत असल्याने गावांच्या विकासामध्ये ग्रामपंचायतीचा सहभाग वाढला आहे.
पंधराव्या वित्त आयोगाचा निधी हा दोन प्रकारचा असून यात अनटाईड (अबंधित) व टाईड (बंधित) असे दोन प्रकार येतात. यामधील जो अनटाईड निधी आहे तो गावातील विकासकामांच्या गरजेनुसार वापरला जातो व टाईड निधी हा शासनाकडून ठरविण्यात आलेल्या ठरावीक कामांसाठी खर्च करण्याचे शासन निर्देश आहेत. यात बंधित (टाईड)निधी अंतर्गत गावातील स्वछता व हगणदारीमुक्तीसाठी सार्वजनिक शौचालय बांधणे, त्याची दुरुस्ती करणे, मुतारी बांधणे, गावातील कचरा संकलन वाहतूक व घनकचरा व्यवस्थापन करणे. पाणीपुरवठा योजने अंतर्गत नळ पाणी पुरवठा योजनेचा विस्तार करणे आणि पाणी पुरवठा योजनेची देखभाल व दुरुस्ती करणे. पावसाचे पाणी संकलन व पुनर्भरण व पाण्याचा पुनरवापर करणे साठी कामे करणे,शेतशिवारातील पाणीशिवारात जिरवण्यासाठी माती बांध, शेत तळे, सिमेंट बांध बांधणे यासारख्या कामांचा समावेश आहे.
निधीमधून पेयजल व पाण्याच्या साठवणूकीचे साधन.मुलांचे लसीकरण, मुलांचे कुपोषण रोखणे,ग्रामपंचायती अंतर्गत रस्ते दुरुस्ती व देखभाल,ग्रामपंचायती अंतर्गत पादचारी रस्ते व बांधकाम दुरुस्ती,एलईडी दिवे व सौर प्रकाश दिवे उभारणी व दुरुस्ती व देखभाल, विद्युतीकरणावरील खर्च, स्मशानभूमीचे बांधकाम, दुरुस्ती व देखभाल आणि स्मशानभूमीसाठी जमीन संपादन, जमीन अधिग्रहण आणि देखभाल आणि मृतदेह दफनभूमीची देखभाल.
ग्रामपंचायतींना पुरेसे आणि उच्च बँड विडथ वाय फाय नेटवर्क सेवा प्रदान करणे,सार्वजनिक वाचनालय, ग्रामपंचायतींमध्ये मुलांच्या उद्यानासह मनोरंजन सुविधा, खेळाचे मैदान रुरल हट (ग्रामीण भागात आठवडी बाजार सोय), नैसर्गीक आपत्ती/साथीच्या रोगात तात्काळ मदत कार्य सुविधा उपलब्ध करून देणे, क्रिडा व शारिरीक तंदुरुस्ती साहीत्य, ड्रेनेज व तुंबलेल्या पाण्याचे व्यवस्थापन करणे ,आकस्मीक आपत्ती व्यवस्थापन असे कामे करण्या बाबत शासन निर्देश आहेत.
यातून ग्रामस्थांना स्वच्छता ,आरोग्य,शिक्षण व पायाभुत मुलभूत सोयी सुविधा उपलब्ध होत आहेत परंतु मुक्ताईनगर विधानसभा क्षेत्रात असणाऱ्या मुक्ताईनगर, बोदवड, रावेर तालुक्यातील अनेक ग्रामपंचायतीना 2023- 24 अंर्तगत 15 व्या वित्त आयोगातील निधीचे वितरण करण्यात आलेले नाही त्यामुळे या गावांमध्ये विकास कामे करण्यासाठी गाव कारभाऱ्यांना अडचणी येत असुन ग्रामस्थ मुलभूत सोयी सुविधां पासून वंचित राहत आहेत.तरी या ग्रामपंचायतींना 15 व्या वित्त आयोगाचा निधी त्वरित वितरित करण्यात यावा. काही ग्रामपंचायतींना निधी मिळण्यासाठी काही तांत्रिक अडचणी वा त्रुटी असतील तर त्या दूर करण्यासाठी स्थानिक ग्रामपंचायत प्रशासनाला मार्गदर्शन करून 15 व्या वित्त आयोगाच्या निधी पासून वंचित या ग्रामपंचायतीना निधी उपलब्ध करून देण्यात यावा अशी निवेदनात मागणी करण्यात आली आहे.