नागपूर (वृत्तसंस्था) आमची एमआयएमसोबत युती महाराष्ट्राच्या नेत्यांशी झाली नाही. तर असदुद्दीन ओवेसी यांच्यासोबत झाली आहे. त्यांची माणसे हैद्राबादवरून आमच्याकडे आली आणि ते आता निरोप घेऊन ओवेसींकडे गेली आहेत. याविषयी जोपर्यंत ओवेसी काही स्पष्ट करत नाही तो पर्यंत आमची युती कायम आहे,’ असे वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबडेकर यांनी म्हटले आहे. दरम्यान, प्रकाश आंबेडकर यांच्या या वक्तव्यामुळे त्यांच्यातील आणि खासदार इम्तियाज जलील यांच्यातील संघर्ष परत एकदा समोर आला आहे.
एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष खा. इम्तियाज जलील यांनी युती तोडण्याचा निर्णय ओवेसी यांच्या सुचनेप्रमाणेच घेतल्याचे स्पष्ट केले होते. आम्हाला खूपच कमी जागा दिल्या जात होत्या. आम्ही बराच काळ वाट पाहिली. वंचित बहुजन आघाडीला प्रस्ताव दिला, मात्र आम्हाला सन्मानजनक जागा मिळाल्या नाही. त्यामुळे अखेर आम्ही आघाडीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला,असे खा.जलील यांनी स्पष्ट केले होते.
दरम्यान, आज आंबेडकर म्हणाले,आमची युती महाराष्ट्राच्या नेत्यांशी झाली नाही. तर ओवेसी यांच्यासोबत झाली आहे. त्यांची माणसं हैद्राबादवरून आमच्याकडे आली आणि आता ओवेसी यांच्याकडे निरोप घेऊन गेली आहेत, अशी माहिती प्रकाश आंबेडकर यांनी दिली. प्रकाश आंबेडकर यांच्या स्पष्टीकरणानंतर एमआयएम आणि वंचित बहुजन आघाडीतील युतीचा गोंधळ आणखी वाढला आहे.