मुंबई- वृत्तसेवा । महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ उडवणारी घटना समोर आली असून राज्यातील अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांचा कथित अश्लील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याचा दावा करण्यात येत आहे. या प्रकरणामुळे राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ माजली असून विरोधकांनी तात्काळ राजीनाम्याची मागणी करत सरकारवर जोरदार हल्लाबोल सुरू केला आहे.
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या कथित व्हिडिओमध्ये मंत्री नरहरी झिरवाळ हे त्यांच्या शासकीय निवासस्थानी एका तृतीयपंथी व्यक्तीसोबत दिसत असल्याचा दावा केला जात आहे. या व्हिडिओमुळे राज्यातील सत्ताधारी गटावर टीकेची झोड उठली आहे. विशेष म्हणजे हा व्हिडिओ सुमारे सात महिन्यांपूर्वीचा असल्याचेही सांगितले जात असले तरी त्याबाबत कोणतीही अधिकृत पुष्टी झालेली नाही. संबंधित व्हिडिओची स्वतंत्ररीत्या पडताळणी झालेली नसल्याने त्याच्या सत्यतेबाबत प्रश्नचिन्ह कायम आहे.

व्हिडिओमध्ये काही मद्याच्या बाटल्या दिसत असल्याचेही बोलले जात आहे. तसेच तृतीयपंथी व्यक्ती म्हणून पवन यादव नावाचा व्यक्ती दिसत असल्याचा दावा केला जात आहे. या सर्व घडामोडींनंतर मंत्री झिरवाळ यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला असता त्यांचा फोन स्विच ऑफ असल्याचे समजते. त्यामुळे या प्रकरणावर त्यांची अधिकृत भूमिका अद्याप समोर आलेली नाही.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांकडून सावध भूमिका घेतली जात आहे. वरिष्ठ नेते जयंत पाटील यांना या संदर्भात विचारले असता त्यांनी व्हिडिओ पाहिल्यानंतरच प्रतिक्रिया देणे योग्य ठरेल असे सांगितले. यामुळे सत्ताधारी गटातही या प्रकरणाबाबत संभ्रमाचे वातावरण असल्याचे दिसून येत आहे.
विरोधक मात्र या प्रकरणावरून आक्रमक झाले असून शासकीय निवासस्थानी अशा प्रकारच्या घटना घडत आहेत का, असा सवाल उपस्थित केला जात आहे. झिरवाळ यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरत असून सरकारची प्रतिमा मलीन झाल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात येत आहे. काही दिवसांपूर्वीच झिरवाळ यांच्या कार्यालयाशी संबंधित लाचखोरीच्या आरोपांनंतर आता हा व्हिडिओ समोर आल्याने त्यांच्या अडचणींमध्ये अधिकच वाढ झाली आहे.
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ यांनी या प्रकरणावर तीव्र प्रतिक्रिया देत सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे. त्यांनी म्हटले की, एका जबाबदार मंत्र्याचा असा आक्षेपार्ह व्हिडिओ समोर येणे हे महाराष्ट्राच्या राजकारणातील नैतिक अध:पतनाचे गंभीर उदाहरण आहे. जनतेच्या विश्वासावर निवडून आलेल्या प्रतिनिधीकडून किमान नैतिकतेची अपेक्षा असते, मात्र या घटनेमुळे त्या अपेक्षांचा भंग झाल्याचे स्पष्ट होते.
संपूर्ण प्रकरणामुळे राज्यातील राजकीय वातावरण तापले असून पुढील काही दिवसांत या मुद्द्यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये संघर्ष तीव्र होण्याची शक्यता आहे. संबंधित व्हिडिओची सत्यता आणि त्यावर सरकारची अधिकृत भूमिका काय असणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.



