Home क्राईम संगमेश्वर महादेव मंदिराच्या गेटला कथित वीजप्रवाह : ट्रस्टकडून दोषींवर कठोर कारवाईची मागणी 

संगमेश्वर महादेव मंदिराच्या गेटला कथित वीजप्रवाह : ट्रस्टकडून दोषींवर कठोर कारवाईची मागणी 

0
170

पहूर, ता. जामनेर – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी ।  जामनेर तालुक्यातील पहूर येथील पवित्र देवळी आणि गोगडी नद्यांच्या संगमावर वसलेल्या श्री क्षेत्र संगमेश्वर महादेव मंदिराच्या लोखंडी प्रवेशद्वारावर कथितरीत्या वीज प्रवाह सोडल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. यामुळे मंदिर परिसरात भीतीचे व तणावाचे वातावरण निर्माण झाले असून, ट्रस्टकडून या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.

या संदर्भात श्री क्षेत्र संगमेश्वर महादेव मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष तथा पुजारी शिवभक्त महाराज, विश्वस्त किशोर बनकर आणि ईश्वर हिवाळे यांनी संयुक्तपणे एक निवेदन पहूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रमोद कठोरे यांच्याकडे सादर केले आहे. निवेदन पोलीस उपनिरीक्षक गणेश सुस्ते यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले. निवेदनात नमूद केले आहे की, मंदिर हे नोंदणीकृत ट्रस्ट (ई-१०८६) मार्फत चालवले जाते आणि मंदिरात कोणतीही आरती समिती किंवा आरती परिवार नेमलेला नाही.

११ सप्टेंबर २०२५ रोजी “साईमत” या स्थानिक दैनिकात प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, मंदिराच्या लोखंडी गेटवर अज्ञात व्यक्तींनी वीजप्रवाह सोडल्याची माहिती समोर आली. ही बाब अत्यंत गंभीर आणि निंदनीय असून, भाविकांच्या सुरक्षेला धोका निर्माण करणारी आहे. अशा प्रकारच्या प्रकारामुळे समाजात शांततेचा भंग होऊ शकतो, तसेच मंदिराची आणि ट्रस्टची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न असल्याचा संशय ट्रस्ट सदस्यांनी व्यक्त केला आहे.

या प्रकरणावरून ट्रस्टने काही गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत – वीजप्रवाह सोडल्याची घटना सत्य आहे का? असे असल्यास संबंधित व्यक्ती कोण होती? या कृतीमागचा उद्देश काय होता? हे कृत्य कोणत्या समाजकंटकांकडून घबराट निर्माण करण्याच्या उद्देशाने करण्यात आले का? आणि या मागे मंदिराच्या प्रतिष्ठेला हानी पोहोचवण्याचा हेतू तर नाही ना?

मंदिर परिसरात सीसीटीव्ही यंत्रणा कार्यरत असल्याने त्यातील फुटेज तपासून सत्यता उघड करता येईल, असेही निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे ट्रस्टने पोलिस प्रशासनाकडे तात्काळ सखोल चौकशी करून संबंधित दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी जोरदार मागणी केली आहे. अशा प्रकारच्या घटना भविष्यात होऊ नयेत यासाठी ठोस पावले उचलण्याची गरज अधोरेखित करण्यात आली.

या घटनेमुळे धार्मिक भावनांना ठेच लागली असून, परिसरात अस्वस्थता आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे संपूर्ण प्रकरणाची पारदर्शक चौकशी होऊन सत्य जनतेसमोर यावे, अशी अपेक्षा भाविकांकडून व्यक्त होत आहे.


Protected Content

Play sound