Home न्याय-निवाडा सरपंच देशमुख हत्या प्रकरणात ‘D2 ऑपरेशन’चा आरोप; उज्वल निकम यांचा न्यायालयात आक्रमक...

सरपंच देशमुख हत्या प्रकरणात ‘D2 ऑपरेशन’चा आरोप; उज्वल निकम यांचा न्यायालयात आक्रमक युक्तिवाद

0
147


बीड – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज वृत्तसेवा। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील सुनावणीत आज बीड न्यायालयात मोठे नाट्य घडले. विशेष सरकारी वकील उज्वल निकम यांनी आरोपींकडून न्यायप्रक्रिया लांबवण्याचे पद्धतशीर प्रयत्न होत असल्याचा गंभीर आरोप करत, याला ‘D2 ऑपरेशन’ असे नाव दिले. आरोपींकडून वारंवार अर्ज करून खटला विलंबित केला जात असल्याचे निकम यांनी ठामपणे न्यायालयात मांडले. त्याचबरोबर त्यांनी आरोपींच्या दोषमुक्ती अर्जावरही जोरदार विरोध केला.

आज बीड जिल्हा व विशेष मकोका न्यायालयात सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाची सुनावणी पार पडली. यावेळी विशेष सरकारी वकील उज्वल निकम स्वतः न्यायालयात हजर होते. आरोपी वाल्मिक कराड आणि विष्णू चाटे वगळता इतर आरोपींनी दोषमुक्तीचे अर्ज दाखल केले होते. या अर्जांवर आज युक्तिवाद झाला. निकम यांनी यावेळी आक्रमक भूमिका घेत दोषमुक्ती अर्जांना विरोध दर्शवला. खटल्याची सुनावणी लांबवण्याचा हा कट असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

उज्वल निकम यांनी माध्यमांशी बोलताना या प्रकाराला ‘D2 ऑपरेशन’ असे संबोधले. “D for Delay the Trial आणि D for Derail the Trial” असे या D2 ऑपरेशनचे स्पष्टीकरण देत, आरोपींकडून सुरू असलेली ही रणनीती न्यायव्यवस्थेचा गैरवापर असल्याचे ते म्हणाले. सतत नवनवीन अर्ज दाखल करून मुद्दाम वेळ खेचण्याचा हा प्रकार गंभीर असल्याचेही त्यांनी सांगितले.

या खटल्यात सीआयडीने एकत्रित आरोपपत्र दाखल केले आहे. यावर आरोपींच्या वकिलांनी हरकती घेत, हे आरोपपत्र चुकीचे असल्याचे म्हटले. असा अधिकार पोलिसांना नसून तो फक्त न्यायालयाचा असल्याचा युक्तिवाद त्यांनी केला. यासाठी त्यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठातील अंजनाबाई गावित प्रकरणाचा संदर्भ दिला.

दरम्यान, मुख्य आरोपी वाल्मिक कराड याचा दोषमुक्ती आणि जामीन अर्ज जिल्हा न्यायालयाने फेटाळल्यानंतर, त्याने उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. 19 सप्टेंबर रोजी औरंगाबाद खंडपीठात या अर्जावर सुनावणी होणार आहे. त्यामुळे या प्रकरणाला पुढील काय वळण मिळणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

आज झालेल्या सुनावणीत काही आरोपींच्या अर्जांवर निर्णय राखून ठेवण्यात आला, तर काही अर्जांबाबत फिर्यादीचे म्हणणे अद्याप न्यायालयासमोर आलेले नसल्याने सुनावणी पुढे ढकलण्यात आली. यामुळे खटल्यातील गुंतागुंत वाढली असून, पुढील सुनावणी 24 सप्टेंबर रोजी होणार असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले.


Protected Content

Play sound