मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | शिवसेनेची आज दुपारी राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक होत असून यात महत्वाचे निर्णय होणार असल्याची माहिती समोर आल्याने याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
राज्याच्या राजकारणातील सत्तेच्या डावपेचांमध्ये आज शनिवारी अनेक महत्वाच्या घडामोडी होण्याची शक्यता आहे. यात एकनाथ शिंदे यांच्या गटातर्फे आपणच खरा शिवसेना पक्ष असल्याचा दावा करणारे पत्र राज्यपालांना देण्यात येणार आहे. तर दुसरीकडे अपक्ष आमदारांनी विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्यावर दाखल केलेल्या अविश्वासाच्या प्रस्तावावर देखील काय निर्णय होणार ? याचा सस्पेन्स वाढला आहे.
दरम्यान, आज दुपारी एक वाजता मुंबईत शिवसेनेची राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक होत आहे. यात एकनाथ शिंदे यांची पक्षाच्या नेतेपदावरून हकालपट्टी करण्यात येणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. शिवसेना पक्षप्रमुख म्हणून उध्दव ठाकरे यात काही महत्वाचे निर्णय घेणार असून यात शिंदे यांच्यासोबत गेलेल्या आमदारांची पदे काढण्यात येतील असेही मानले जात आहे.