धरणाचा सांडवा फुटला : जामनेर तालुक्यातील २७ गावांना सतर्कतेचा इशारा

जामनेर प्रतिनिधी । कांग नदीवर असलेल्या चारू धरणाच्या सांडव्याची गार्डनींग वॉल तुटल्यामुळे पाणीप्रवाह सांडव्यातून नदिपात्रात जाण्याऐवजी धरणाच्या भिंतीकडे वळल्याने भिंत पोखरली गेली असल्याने परिसरात घबराट पसरली आहे. दरम्यान, संभाव्य धोका पहाता कांग नदिकाठच्या जामनेर तालुक्यातील काही गावांना सतर्कतेचा ईशारा देण्यात आला आहे.

याबाबत वृत्त असे की, कांग नदीचा उगम बुलढाणा जिल्ह्यातील गिरडा घाटात होऊन पुढे ती सोयगाव तालुक्यातील चारू गावाला वळसा घालून वसंतनगर गावापासून जामनेर तालुक्यात येते. बुधवारी दुपारपासून बुलढाणा अजिंठा-घाटपरिसरात जोरदार पाऊस झाला. यापुर्वीच झालेल्या पावसामुळे सर्व धरणे भरलेली आहेत. त्यामुळे येणारे सर्व पाणी कांग नदिला मिळाल्याने मोठा पुर आला. उगमानंतर सोयगाव तालुक्यातील चारू या गावाजवळ ३.५८ दशलक्ष घनमिटर क्षमतेचे धरण आहे. या धरणाच्या सांडव्यातून विसर्ग वाढल्याने सांडव्याला असलेली गार्डनींग वॉल फुटली. त्यामुळे प्रवाह नदिपात्रात न जाता मागे फिरून धरणाच्या भिंतीवर धडकला. त्यामुळे भिंतीचा भला मोठा भाग खचण्यास सुरूवात झाली. काही नागरीकांच्या लक्षात हा प्रकार आल्याने नागरीकांनी खात्री होताच औरंगाबाद पाटबंधारे विभाग अधिकार्‍यांना फोन करून याबाबत माहती दिली. संभाव्य धोका पहाता काही अधिकारी व कर्मचार्‍यांनी सकाळी सहा वाजेलाच चारू धरण गाठले व उपाययोजनांबाबत हालचाली सुरू केल्याने धोका टळला.

सांडवा फोडला


धरणाच्या सांडव्यातून होणारा विसर्ग मोठ्याप्रमाणावर होता. गार्डनींग वॉल तुटल्याने तो धरणाच्या भिंतीवर धडकला. भिंत खचत असल्याने प्रवाह सांडव्यातून होणे गरजेचे होते. म्हणून पाटबंधारे विभाग अधिकार्‍यांनी सांडव्यात ब्लॉस्टींग करून व पोखलँड मशीनने खोल करून गुरूवारी सकाळपासून सायंकाळपर्यंत प्रवाह सुरळीत केला. यामुळे किमान आजतरी धोका टळला असून भिंतीचा खचलेला भराव पुर्ण करणे गरजेचे आहे. मात्र पाऊस व सांडव्यातून भराव करण्यासाठी वाहतुक करणे शक्य नसल्याने अडचणी आहेत.

सुरक्षीत ठिकाणी आसरा


दरम्यान, चारू धरण फुटण्याची शक्यता असल्याचे ग्रामस्थांच्या लक्षात आले. त्यामुळे धरणाच्या खालच्या बाजूला असलेल्या चारूव चारूतांडा गावातील नागरीकांनी गावाजवळील टेकडीवर आसरा घेतला. तर पुढे जामनेर तालुक्यातील वसंतनगर व तांड्यातील नदिकाठी रहिवासी असलेल्या ग्रामस्थांनी वसंतनगर जिल्हा परिषद शाळेत आसरा घेतला. गुरूवारी तालुक्यातील काही गावांना सतर्कतेचा ईशारा दिला.

जामनेरातील गावांना इशारा


कांग नदिवर सोयगाव तालुक्यातील चारू व त्यानंतर जामनेर तालुक्यातील गोद्रीजवळ कांग धरण आहे. बुधवारी कांगच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या पावसामुळे चारू धरण फुटण्याचा मोठा धोका निर्माण झाला होता. संभाव्य धोका पहाता कांग नदिकाठच्या जामनेर तालुक्यातील वसंतनगर, गोद्री, फत्तेपूर, टाकळी, मेहेगाव, निमखेडी, जळांद्री या गावांना सतर्कतेचा ईशारा देण्यात आला. तर फत्तेपूर गावातील नदिकाठी रहाणार्‍या नागरीकांना घरे खाली करण्याच्या सुचना देण्यात आल्याची माहती फत्तेपूरचे मंडळ अधिकारी विष्णू पाटील यांनी दिव्य मराठीशी बोलतांना दिली.

परिस्थितीवर नजर- तहसीलदार

याबाबत सोयगावचे तहसीलदार प्रवीण पांडे म्हणाले की, बुधवारी कांग नदीच्या पाणलोट क्षेत्रात भरपूर पाऊस झाला. आधीच धरण भरलेले असल्याने चारू धरणाच्या सांडव्यातून विसर्ग वाढला. सांडव्याची गार्डणींग वॉल कोसळल्याने यु टर्ण घेऊन पाणी धरणाच्या भिंतीला धडकले. त्यामुळे धरणाच्या मुख्य भिंतीचा मधोमध्य भराव खचला.याबाबत पाटबंधारे विभाग अधिकार्‍यांनी उपाययोजना केल्या आहेत. स्वत: घटनास्थळीच असून परिस्थितीवर नजर ठेऊन आहोत.

जिव मुठीत घेऊन बसलो-चव्हाण

दिवसभर पाऊस होता. रात्री धरण फुटणार असल्याची अफवा पसरली. त्यामुळे चारू व चारूतांडा गावातील सर्व रहिवाशांनी गावाजवळील टेकडीवर जाऊन बसले. मुलाबाळांना पोटाशी घेऊन अक्षरश: रात्र बसून काढली. सकाळी सहा वाजेला तहिसलदार व अधिकारी आले. त्यांनी काम सुरू केल्यांनतर धिर आला. आणखी पाऊस झाला तर? अशी भिती आजही मनात कायम असल्याची प्रतिक्रिया चारूतांडा येथील ग्रामस्थ लालचंद चव्हाण, यांनी व्यक्त केली आहे.

Protected Content