Home क्राईम पारोळ्यात दारूची जास्त दराने विक्री, मद्यपींमध्ये नाराजी !

पारोळ्यात दारूची जास्त दराने विक्री, मद्यपींमध्ये नाराजी !


पारोळा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहर आणि तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून देशी आणि विदेशी दारूची विक्री जास्त दराने होत असल्याचा आरोप मद्यपींनी केला आहे. शहरातील देशी दारूची दुकाने आणि वाईन शॉपमध्ये जुना स्टॉक शिल्लक असतानाही, त्यावर असलेल्या प्रिंट रेटपेक्षा १०, १५, किंवा २० रुपये जास्त घेतले जात आहेत. यामुळे मद्यपींमध्ये तीव्र नाराजी असून, त्यांनी याबाबत जिल्हाधिकारी आणि दारूबंदी अधीक्षक, जळगाव यांच्याकडे ऑनलाइन तक्रार करण्याचा निर्णय घेतला आहे.

वाद आणि कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न
काही मद्यपींनी दुकानदारांकडे याबद्दल विचारणा केली असता, वाद होऊन शिवीगाळ झाल्याचेही समजते. सध्या हा वाद मर्यादित असला तरी, जर दारूची जास्त दराने विक्री सुरूच राहिली, तर भविष्यात यावरून गंभीर वाद होण्याची शक्यता नाकारता येत नाही. आगामी गणेशोत्सव, नवरात्रोत्सव आणि रथोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहराची शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी जिल्हाधिकारी आणि पोलीस प्रशासनाने वेळीच लक्ष घालण्याची मागणी होत आहे.

दर फलक लावण्याची मागणी
शांताराम पाटील, मुकेश नाईक आणि जगन्नाथ भिल यांच्यासह काही मद्यपींनी आपली व्यथा मांडताना, दुकानाबाहेर दारूच्या बाटल्यांचे दर फलक लावण्याची मागणी केली आहे. यामुळे दराबाबत होणारे वाद टाळता येतील आणि ग्राहकांची होणारी फसवणूक थांबेल, असे त्यांचे म्हणणे आहे. या मागणीवर जिल्हास्तरावर योग्य विचार व्हावा, अशी त्यांची अपेक्षा आहे. दारूची विक्री प्रिंट रेटनुसारच झाली पाहिजे, जेणेकरून कोणत्याही वादाला जागा राहणार नाही. यावर प्रशासनाने तातडीने लक्ष घालून कारवाई करावी, अशी रास्त मागणी जोर धरत आहे.


Protected Content

Play sound