मुंबई वृत्तसंस्था । बॉलिवूड अभिनेता अक्षयकुमारने नागरिकत्व कायद्याविरोधात आंदोलन करणाऱ्या ‘जामिया मिलिया इस्लामिया’ विद्यापीठातील विद्यार्थ्यांचे ट्वीट लाईक केल्यामुळे सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे. त्यानंतर अक्षय कुमारने या ट्वीटद्वारे स्पष्टीकरण दिले असून हा सर्व प्रकार अनवधानाने घडल्याचे स्पष्ट केले आहे.
अक्षयने ट्वीट केलं आहे की, “जामिया मिलियाच्या विद्यार्थ्यांचं ट्वीट लाईक करण्याबाबत बोलायचं झालं तर ते माझ्याकडून चुकून झालं. मी स्क्रोल करत होतो आणि चुकून माझ्याकडून लाईक प्रेस झालं. माझ्या लक्षात येताच मी ते ट्वीट अनलाईक केलं. मी अशा कोणत्याही गोष्टींचे समर्थन करत नाही.” असे स्पष्टीकरण अक्षयने दिले आहे.
दिल्लीच्या जामियानगर परिसरात पोलिस आणि विद्यार्थ्यांमध्ये झालेल्या हिंसाचारावरुन देशभरात नाराजी आहे. अशातच बॉलिवूड कलाकार या मुद्द्यावर काय भाष्य करतात याची प्रतीक्षा करत होते. मात्र बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमारने असे काही केले की, तो नेटीझन्सच्या नजरेत आला. अक्षय कुमारने आपल्या ट्विटर हॅण्डलवरुन जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठातील हिंसेची थट्टा करणारे ट्वीट लाईक केले. मात्र त्यानंतर अक्षयने तो अनलाईक केले. या लाईक आणि अनलाईकच्या काळात अक्षय कुमारवर काही जणांनी टीका करण्यास सुरुवात केली. एक कलाकार असल्याने हिंसेची थट्टा करणाऱ्यांचे समर्थन करताना पाहून नेटीझन्सनी अक्षय कुमारला खडे बोल सुनावले. पण यानंतर अक्षय कुमारने या प्रकरणावर स्पष्टीकरण दिले आहे.