Home धर्म-समाज किनगावात उद्यापासून अखंड हरिनाम संकीर्तन सप्ताह 

किनगावात उद्यापासून अखंड हरिनाम संकीर्तन सप्ताह 


यावल-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील किनगाव येथे श्रीराम मंदिर संस्थानतर्फे दरवर्षीप्रमाणे यंदाही गुरुवार दि. २६ मार्चपासून अखंड हरिनाम संकीर्तन सप्ताह व श्रीमद् भागवत पुराण कथेचे आयोजन करण्यात आले असून या धार्मिक सोहळ्यामुळे परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण होणार आहे.

या सप्ताहादरम्यान दररोज सकाळी ५ ते ७ या वेळेत काकडा आरती होईल. त्यानंतर सकाळी ८:३० ते ११:३० या वेळेत श्रीमद् भागवत पुराण कथेचे पहिले सत्र पार पडेल. दुपारी ३ ते ५ या वेळेत दुसरे सत्र आयोजित करण्यात आले आहे. सायंकाळी ५ ते ७ हरिपाठ आणि रात्री ८ ते १० या वेळेत संकीर्तनाचा कार्यक्रम होणार असल्याने दिवसभर विविध धार्मिक उपक्रमांची रेलचेल राहणार आहे. शुक्रवार दि. ३ रोजी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले असून सायंकाळी ४ वाजता दिंडी सोहळा मोठ्या उत्साहात पार पडणार आहे.

या सप्ताहात विविध भागातील नामवंत कीर्तनकारांची उपस्थिती लाभणार आहे. दि. २६ रोजी ह.भ.प. हेमंत महाराज (जळगाव), दि. २७ रोजी ह.भ.प. विशाल महाराज (वाकडी), दि. २८ रोजी ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज (पुनगाव), दि. २९ रोजी ह.भ.प. भूषण महाराज (आंबापिंपरी), दि. ३० रोजी ह.भ.प. सूर्यभान महाराज (शेळगाव), दि. ३१ रोजी ह.भ.प. समाधान महाराज (रेंभोटा), दि. १ रोजी सकाळी ह.भ.प. महेश महाराज (उंटावद) व रात्री ह.भ.प. श्रीकृष्ण महाराज (चाळीसगाव), दि. २ रोजी ह.भ.प. मनोज महाराज (दुसखेडा) आणि दि. ३ रोजी ह.भ.प. तुकाराम महाराज (मेहुण) यांच्या काल्याच्या कीर्तनाने सप्ताहाची सांगता होणार आहे.

या संकीर्तन सप्ताहात गायनाचार्य म्हणून ह.भ.प. सुरेश महाराज गंगावणे (शिंगोडा), ह.भ.प. लीलाधर महाराज (किनगाव) व ह.भ.प. कैलास महाराज (किनगाव) यांची सेवा लाभणार आहे. तसेच मृदुंगाचार्य म्हणून ह.भ.प. प्रकाश महाराज व ह.भ.प. दीपक महाराज (किनगाव) हे साथसंगत करणार आहेत. विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांमुळे भक्तांना आध्यात्मिक समाधान मिळणार असून मोठ्या संख्येने भाविक उपस्थित राहण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

श्रीराम मंदिर संस्थान, किनगाव यांनी परिसरातील सर्व भाविकांना या अखंड हरिनाम संकीर्तन सप्ताह व श्रीमद् भागवत पुराण कथेचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे. भक्ती, श्रद्धा आणि सामूहिक सहभागातून हा सप्ताह गावासाठी एक आध्यात्मिक उत्सव ठरणार आहे.


Protected Content

Play sound