यावल-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । यावल शहरासाठी अभिमानाची बाब ठरणारी घटना घडली असून, येथील ज्येष्ठ पत्रकार राजू कवडीवाले यांचे चिरंजीव आकाश कवडीवाले यांची थायलंडस्थित आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या युनिलॅम्प लाईटिंग कंपनीत महत्त्वाच्या जबाबदारीवर निवड झाली आहे. भारतासह सार्क देशांचा प्रादेशिक व्यवस्थापक म्हणून त्यांची पदोन्नती करण्यात आली असून, त्यांच्या यशामुळे यावलच्या नावाला आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळख मिळाली आहे.
आकाश कवडीवाले यांच्या पदोन्नतीची अधिकृत घोषणा ५ जानेवारी रोजी करण्यात आली. युनिलॅम्प लाईटिंग कंपनीत कार्यरत असताना त्यांनी पश्चिम भारतातील कामकाजाचे सलग तीन वर्षे अत्यंत यशस्वी नेतृत्व केले. या कालावधीत त्यांनी कंपनीच्या व्यवसायवृद्धीत मोलाची भूमिका बजावली असल्याने व्यवस्थापनाने त्यांच्यावर अधिक व्यापक जबाबदारी सोपवली आहे.

नवीन जबाबदारीनुसार आकाश कवडीवाले यांच्याकडे भारतासह बांगलादेश, श्रीलंका, नेपाळ, पाकिस्तान, भूतान, मालदीव आणि अफगाणिस्तान अशा एकूण आठ देशांच्या सार्क बाजारपेठेचे प्रादेशिक व्यवस्थापन सोपवण्यात आले आहे. या देशांतील व्यवसायविस्तार, धोरणात्मक नियोजन आणि बाजारपेठेतील समन्वयाची महत्त्वाची जबाबदारी ते सांभाळणार आहेत.
युनिलॅम्पमध्ये काम करत असताना आकाश यांनी कंपनीच्या उत्पादन श्रेणीचे सखोल ज्ञान आत्मसात केले असून, प्रकाशयोजना डिझाइनर्स तसेच चॅनेल भागीदारांशी त्यांनी मजबूत व्यावसायिक संबंध निर्माण केले आहेत. याशिवाय संपूर्ण प्रदेशातील वास्तुशिल्पीय व बाह्य प्रकाशयोजना बाजारपेठेची स्पष्ट आणि सखोल समज त्यांनी दाखवून दिली आहे, असे कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी नमूद केले आहे.
आकाश कवडीवाले यांच्या या आंतरराष्ट्रीय पातळीवरील यशाबद्दल यावलसह जिल्ह्यातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. पत्रकारितेतील योगदानासाठी ओळख असलेल्या कवडीवाले कुटुंबाच्या शैक्षणिक व व्यावसायिक परंपरेला आकाश यांनी जागतिक स्तरावर नवे परिमाण दिल्याची भावना नागरिकांतून व्यक्त होत आहे.



