जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजितदादा पवार यांच्या अकाली आणि दुःखद अपघाती निधनानंतर त्यांच्या कार्याबद्दल आणि व्यक्तिमत्त्वाबद्दल जळगाव शहराचे आमदार राजूमामा भोळे यांनी भावपूर्ण भावना व्यक्त करत श्रद्धांजली अर्पित केली. माध्यमांशी बोलताना त्यांनी सांगितले की, “अजितदादा नेहमी स्मरणात राहतील.”

पत्रकारांशी संवाद साधताना आ. भोळे म्हणाले, “अजितदादा हे केवळ मोठे राजकीय नेते नव्हते, तर ते अत्यंत शिस्तप्रिय, कामात काटेकोर आणि वेळेचे महत्त्व जाणणारे नेतृत्व होते. त्यांच्या काम करण्याच्या पद्धतीत शिस्त, निर्णयक्षमतेत ठामपणा आणि प्रशासनावर मजबूत पकड होती. हीच त्यांची खरी ओळख होती.”

ते पुढे म्हणाले, “जनतेच्या प्रश्नांबाबत ते अत्यंत संवेदनशील होते. प्रत्येक कामात त्यांनी पारदर्शकता आणि वेग यांना प्राधान्य दिले. त्यांच्या नेतृत्वाखाली राज्यात अनेक विकासकामे गतीने पूर्ण झाली. सर्वसामान्य माणसाला न्याय मिळवून देण्याची त्यांची धडपड कायम स्मरणात राहील.”
“दादांचा साधेपणा, लोकांशी थेट संवाद साधण्याची पद्धत आणि कठीण प्रसंगातही शांत व ठाम राहण्याची वृत्ती ही सर्वांसाठी प्रेरणादायी होती. त्यांच्या निधनाने महाराष्ट्राच्या राजकारणात आणि सामाजिक क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे,” असेही आ. भोळे यांनी नमूद केले.



