Home राजकीय अजितदादा पवार यांच्या जाण्याने दिलदार मित्र हरपला – देवंद्र फडणवीस ; तीन...

अजितदादा पवार यांच्या जाण्याने दिलदार मित्र हरपला – देवंद्र फडणवीस ; तीन दिवसांचा दुखवटा जाहीर


बारामती-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज वृत्तसेवा । महाराष्ट्राच्या राजकीय आणि सामाजिक जीवनाला हादरवणारी अत्यंत दुर्दैवी बातमी आज सकाळी समोर आली. उपमुख्यमंत्री आणि प्रभावी लोकनेते म्हणून ओळख असणारे अजितदादा पवार यांचे बारामतीजवळ झालेल्या विमान अपघातात निधन झाल्याची वार्ता मिळताच संपूर्ण राज्यात शोककळा पसरली असून राजकीय, सामाजिक व प्रशासकीय स्तरावर हळहळ व्यक्त केली जात आहे.

आज सकाळी बारामती परिसरात एका खासगी विमानाचा भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत अजित पवार यांच्यासह एकूण पाच जणांचा मृत्यू झाल्याची अधिकृत माहिती देण्यात आली आहे. अपघात नेमका कशामुळे झाला, याबाबत प्राथमिक तपास सुरू असून प्रशासन आणि आपत्कालीन यंत्रणा घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. या दुर्घटनेचे वृत्त पसरताच राज्यभरातून शोकसंदेशांचा पूर आला.

या दुर्दैवी घटनेनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले की, अतिशय अनाकलनीय परिस्थितीत हा अपघात घडला असून अजितदादा पवार यांच्या जाण्याने महाराष्ट्रावर मोठा आघात झाला आहे. ते केवळ राजकीय नेते नव्हते, तर महाराष्ट्राच्या प्रत्येक कोपऱ्याची जाण असलेले, जनसामान्यांशी घट्ट नातं ठेवणारे लोकनेते होते. संघर्षातून उभे राहिलेले आणि कोणत्याही परिस्थितीत न डगमगणारे त्यांचे नेतृत्व राज्यासाठी दिशादर्शक होते, असेही त्यांनी नमूद केले.

मुख्यमंत्र्यांनी पुढे सांगितले की, अजित पवार यांचे निघून जाणे हे अविश्वासनीय असून मनाला चटका लावणारे आहे. महाराष्ट्राच्या विकासात महत्त्वाची भूमिका बजावणारे नेतृत्व अशा काळात हरपणे ही भरून न निघणारी हानी आहे. अशा प्रकारचे नेते घडायला अनेक वर्षे लागतात आणि त्यांच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी भरून काढणे अतिशय कठीण आहे, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.

देवेंद्र फडणवीस यांनी वैयक्तिक पातळीवरही शोक व्यक्त करताना अजित पवार यांना “दमदार आणि दिलदार मित्र” असे संबोधले. या घटनेचा आघात त्यांच्या कुटुंबावर अत्यंत मोठा असून राज्य सरकार त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. पंतप्रधान, गृहमंत्री तसेच केंद्रातील वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करून संपूर्ण परिस्थितीची माहिती देण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.

या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने आज संपूर्ण महाराष्ट्रात शासकीय सुट्टी जाहीर केली असून तीन दिवसांचा दुखवटा पाळण्यात येणार आहे. पुढील सर्व विधी आणि निर्णय कुटुंबीयांशी चर्चा करून त्यांच्या संमतीनेच घेण्यात येतील, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. सुप्रिया सुळे आणि पार्थ पवार यांच्याशी संपर्क साधून त्यांना धीर देण्यात आला असल्याची माहितीही देण्यात आली.

एकूणच अजित पवार यांच्या अचानक निधनामुळे केवळ महाराष्ट्रच नव्हे तर देशभरात शोककळा पसरली असून राजकीय क्षेत्रातील एक अनुभवी, संघर्षशील आणि जनतेशी नाळ जुळलेला नेता हरपल्याची भावना सर्वत्र व्यक्त होत आहे.


Protected Content

Play sound