मुंबई-वृत्तसेवा | राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबत संशय अधिक गडद होत असून हा अपघात नसून घातपातच असल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी पुन्हा एकदा ठामपणे केला आहे. ज्यांना हा घातपात वाटत नाही, त्यांनी तो केवळ अपघात होता हे सिद्ध करून दाखवावे, असे थेट आव्हान मिटकरी यांनी दिले आहे.
मिटकरी म्हणाले की, या अपघातात वैमानिक सुमित कपूर यांचा मृत्यू झाल्याचे सांगितले गेले. मात्र, त्यांच्या पत्नीनेच ते जिवंत असल्याचा दावा सोशल मीडियावर केला आहे. जर सुमित कपूर जिवंत असतील, तर त्या वेळी विमान नेमके कोण चालवत होते? शांभवी पाठक की अन्य कोणी? हा अत्यंत गंभीर प्रश्न असून सत्य जनतेसमोर आलेच पाहिजे, असे त्यांनी स्पष्ट केले.

अपघाताच्या वेळी DGCA ने विमानात सहा जण असल्याची माहिती दिली होती. त्यापैकी पाच मृतदेह सापडले आणि घड्याळाच्या आधारे ओळख पटल्याचे सांगण्यात आले. मात्र, आता त्या मृतदेहाच्या हातात घड्याळच नव्हते, असे सांगितले जात आहे. त्यामुळे या संपूर्ण घटनेवर संशय निर्माण झाला असून अनेक प्रश्न अनुत्तरित असल्याचे मिटकरी म्हणाले.
ते पुढे म्हणाले की, या प्रकरणात FIR का दाखल करण्यात आली नाही, हा सर्वात मोठा प्रश्न आहे. एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याला फोन आल्यानंतर FIR प्रक्रिया थांबवण्यात आली. त्या अधिकाऱ्याला कोणाचा फोन आला आणि कोणाच्या दबावाखाली कारवाई रोखण्यात आली, याचा खुलासा झाला पाहिजे.
मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात घडलेल्या प्रकारावरही मिटकरी यांनी संताप व्यक्त केला. त्यांनी सांगितले की, त्या वेळी आमदार रोहित पवार, कायदेशीर सल्लागार आणि इतर आमदार उपस्थित होते. सुरुवातीला पोलीस अधिकारी शिवाजी पिंगळे यांनी तक्रार समजून घेतली होती. मात्र, नंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी हस्तक्षेप करून FIR दाखल करण्यास नकार दिला. हा लोकप्रतिनिधींचा अपमान असून अत्यंत निंदनीय प्रकार असल्याचे त्यांनी म्हटले.
मिटकरी यांनी सांगितले की, हा विषय आता केवळ एका नेत्यापुरता मर्यादित राहिलेला नाही, तर संपूर्ण राज्याच्या जनतेशी संबंधित आहे. बारामतीसह महाराष्ट्रभर जनतेत संताप असून या प्रकरणाची सखोल चौकशी झालीच पाहिजे. या अपघातासाठी जबाबदार असलेल्या अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल झाला पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली.
दरम्यान, हा मुद्दा लावून धरल्यामुळे संबंधित यंत्रणांवर दबाव वाढला असून चौकशी टाळता येणार नाही, असा इशारा मिटकरी यांनी दिला. जोपर्यंत सत्य बाहेर येत नाही, तोपर्यंत आम्ही हा मुद्दा सोडणार नाही, असेही त्यांनी ठामपणे सांगितले.



