
अमळनेर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । अमळनेर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा शेतकरी रूपातील महाराष्ट्रातील पहिला पुतळा उभारला जाणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. बाजार समितीचे सभापती अशोक आधार पाटील यांनी ही माहिती देत मार्च महिन्यात होणाऱ्या वार्षिक सर्वसाधारण सभेत या पुतळ्याचे अनावरण होणार असल्याचे सांगितले. या निर्णयामुळे अमळनेर तालुक्यात राजकीय व सामाजिक पातळीवर चर्चेला उधाण आले आहे.

अजित पवार यांचे अमळनेरशी विकासाचे नाते घट्ट जुळले होते. आमदार अनिल पाटील, माजी आमदार साहेबराव पाटील तसेच माजी नगराध्यक्ष स्व. सुरेश ललवाणी यांच्या माध्यमातून अमळनेरच्या विकासाला गती मिळाली. विविध पायाभूत सुविधा, बाजार समितीची आर्थिक शिस्त आणि पारदर्शक कारभार यामुळे अमळनेर बाजार समितीने जिल्ह्यात अव्वल स्थान पटकावले आहे. या पार्श्वभूमीवर अजित पवार यांच्या कार्याचा गौरव म्हणून शेतकरी रूपातील पुतळा उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
आमदार अनिल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच खासदार स्मिता वाघ यांच्या सहकार्याने बाजार समितीने प्रगतीची झेप घेतली आहे. उपसभापती, संचालक मंडळ, व्यापारी, सचिव, कर्मचारी, हमाल, मापाडी आणि गुमास्ता यांच्या एकत्रित प्रयत्नांमुळे समितीचा कारभार अधिक शिस्तबद्ध आणि पारदर्शक झाला आहे. आवक वाढल्याने पणन कर्जाची नियमित परतफेड करण्यात आली असून, सुपरव्हिजन फी व अंशदान नियमित भरल्यामुळे पणन विभागाकडून पाच टक्के व्याजदराने सुमारे सहा लाख रुपयांचा बोनस प्राप्त झाला आहे. या बोनस निधीतून मार्चमधील सर्वसाधारण सभेत शेतकऱ्यांचा सत्कार करण्यात येणार असल्याचे सभापती अशोक पाटील यांनी स्पष्ट केले.
बाजार समितीच्या आवारात १३६ दुकान गाळ्यांचे बांधकाम अंतिम टप्प्यात असून नवीन लेखापाल कार्यालय उभारण्यात आले आहे. पातोंडा उपबाजारात वे-ब्रिजची सुविधा सुरू करण्यात आली आहे. बाजार समितीच्या पेट्रोल पंपावर इलेक्ट्रिक वाहनांसाठी चार्जिंग स्टेशन कार्यान्वित झाले असून मारवड उपबाजार समितीत संरक्षक भिंतीचे बांधकाम पूर्ण झाले आहे. या सर्व विकासकामांचे उद्घाटनही लवकरच पार पडणार आहे.
याशिवाय शेतकरी भवन, हमाल-मापाडी भवन आणि व्यापाऱ्यांसाठी सुसज्ज २०० फूट शेडचे भूमिपूजन करण्यात येणार आहे. उन्हाळ्यात लिलावासाठी येणाऱ्या शेतकऱ्यांना मोफत थंड पेय, तर हिवाळा व पावसाळ्यात मोफत चहाची सुविधा उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. बाजार समितीचा कारभार ज्या अन्नदात्या शेतकऱ्यांच्या बळावर चालतो, त्या शेतकऱ्यांचा यथोचित सन्मान वार्षिक सभेत करण्यात येणार असल्याचेही सभापती अशोक पाटील यांनी सांगितले.



