मुंबई, वृत्तसंस्था | राष्ट्रवादीचे बंडखोर नेते अजित पवार यांनी भाजपशी हातमिळवणी करून उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्यानंतर अवघ्या तीन दिवसांनी त्यांनी आज पदाचा राजीनामा दिला आहे. राजकीय संन्यास घेण्याच्या अटीवर त्यांनी राजीनामा दिल्याचे सूत्रांकडून सांगितले जात आहे.
गेल्या काही दिवसांपासून अजित पवार यांच्या भूमिकेकडे सगळ्यांचे लक्ष लागल्रे होते. अजित पवार यांनी राष्ट्रवादीतून फुटून भाजपशी हातमिळवणी केली होती आणि त्यानंतर राजभवनात उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती. राष्ट्रवादीतील आमदारांचा आपल्याला पाठिंबा आहे, असा विश्वास त्यांनी वेळोवेळी व्यक्त केला होता. राष्ट्रवादीच्या आमदारांचा मोठा गट आपल्या पाठिशी असल्याचा दावा करणारे अजित पवार यांची मनधरणी करण्याचे प्रयत्न गेल्या तीन दिवसांपासून सुरू होते. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते त्यांच्या मनधरणीसाठी प्रयत्न करत होते. त्यांच्याशी चर्चा झाल्या. अजित पवार यांचं मतपरिवर्तन करण्यात राष्ट्रवादीच्या नेत्यांना मंगळवारी यश आल्याचं बोलले जात होते. मात्र, अजित पवार यांनी त्याबाबत काहीही स्पष्ट केले नव्हते. अखेर आज दुपारी अजित पवार यांनी मुख्यमंत्र्यांकडे उपमुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे.
आमदारांनी सोडलेली साथ आणि पवार कुटुंबीयांच्या मनधरणीनंतर त्यांनी माघार घेतल्याचे बोलले जात आहे. तर दुसरीकडे राजकीय संन्यास घेण्याच्या अटीवर त्यांनी उपमुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्याचे सूत्रांकडून सांगितले जात आहे. दुसरीकडे, पवार कुटुंबीय व राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ नेत्यांकडून अजितदादांची मनधरणी सुरू होती. खासदार सुप्रिया सुळे, रोहित पवार यांनी ट्विटरच्या माध्यमातून अजित पवारांना भावनिक आवाहन केले होते. सुप्रिया यांचे पती सदानंद सुळे यांनी आज अजित पवारांची भेट घेतल्याचीही चर्चा होती. त्यामुळे त्यांच्यावर दबाव वाढला होता. त्यातूनच त्यांनी माघार घेतल्याचे बोलले जात आहे.