मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | आगामी विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस कमी जागा घेईल. पण निवडणुकीनंतर महायुतीची सत्ता आली तर पक्षाला उपमुख्यमंत्रीपदासह अर्थमंत्रीपद देण्यात यावे, अशी अट उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महायुतीपुढे ठेवल्याचा दावा एका इंग्रजी वृत्तपत्राने भाजपच्या एका नेत्याचा दाखला देत केला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेस आता विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागली आहे. पण लोकसभा निवडणुकीतील सुमार कामगिरीमुळे महायुतीच्या जागावाटपात पक्षाला दुय्यम स्थान मिळण्याची शक्यता आहे. अजित पवार यांनीही वस्तुस्थिती लक्षात घेऊन जागावाटपाच्या मुद्यावर तडजोड करण्याची भूमिका स्विकारली आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, राज्यात ऑक्टोबरच्या मध्यात विधानसभा निवडणुकीचा फड रंगण्याची चिन्हे आहेत. त्यानुसार महायुतीने जागवाटपाची चर्चा सुरू केली आहे. त्यात भाजप 140 हून अधिक जागा लढवण्याची शक्यता आहे. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेच्या वाट्याला 80 ते 90 जागा जाण्याची शक्यता आहे. याऊलट अजित पवारांच्या राष्ट्रवादीला तिसऱ्या क्रमांकाच्या जागांवर समाधान मानावे लागेल. विशेषतः अजित पवार यांनी स्वतः असे संकेत दिलेत, असे या घटनाक्रमाची माहिती असणाऱ्या एका नेत्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितली आहे.