मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून आज मुंबई शिक्षक मतदार संघासाठी शिवाजीराव नलावडे यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. शिवाजीराव नलावडे हे या अगोदर दोन वेळा पूर्व उपनगरातून विधानसभा निवडणूक लढले आहेत. तसेच पदवीधर मतदार संघातून ही त्यानी निवडणूक लढली आहे. मात्र त्यांना यश आले नव्हते. मात्र सहकार क्षेत्रात त्यांचे मोठे नाव आहे. त्यामुळे त्यांना ही उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे मुंबई शिक्षक मतदारसंघासाठी उमेदवारी जाहीर झाल्यानंतर उमेदवार शिवाजीराव नलावडे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पूर्ण ताकदीने मुंबई शिक्षक मतदारसंघाची निवडणूक लढवत असल्याचं त्यांनी सांगितलं. या निवडणुकीत पक्षनेतृत्वाने दिलेल्या संधीचं सोनं करणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
अजित पवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवलेले शिवाजीराव नलावडे राष्ट्रवादीच्या संस्थापक सदस्यांपैकी एक आहेत. राज्याच्या सहाकार चळवळीत शिवाजीराव नलावडे यांचे मोठे नाव असल्याचे अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून सांगण्यात येते. शिवाजीराव नलावडे यांनी मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष आहेत. सध्या ते मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक आहेत. शिवाय, मुंबई शहरात दोन शाळा त्यांनी उभारल्या आहेत.