
मुंबई-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज वृत्तसेवा । राज्यातील २९ महानगरपालिका निवडणुकांचे मतदान पार पडले असून आता सर्वांचे लक्ष निकालांकडे लागले आहे. उद्या १६ जानेवारी रोजी सकाळी १० वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होणार असून सायंकाळी ५ वाजेपर्यंत अंतिम निकाल स्पष्ट होण्याची शक्यता आहे. तत्पूर्वी समोर आलेल्या एक्झिट पोलमुळे राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली असून, पुणे आणि मुंबई महापालिकांबाबतचे अंदाज अनेक दिग्गज नेत्यांना धक्का देणारे ठरत आहेत.

मतदानानंतर विविध संस्थांचे एक्झिट पोल जाहीर होऊ लागले असून, त्यातून मुंबईत ठाकरे गटाच्या सत्तेला मोठे आव्हान उभे राहत असल्याचे संकेत मिळत आहेत. मुंबईनंतर सर्वाधिक लक्ष लागलेल्या पुणे महापालिकेत भाजपच सत्ता काबीज करणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. अजित पवारांनी पुण्यातील निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची बनवली होती, त्यामुळे येथे काय होणार याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष होते. मात्र एक्झिट पोलचे आकडे पाहता अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
प्राब अर्थात पॉलिटिकल ब्युरो अँड अॅनालिसिस ब्युरो या संस्थेने दिलेल्या एक्झिट पोलनुसार पुणे महापालिकेच्या १६२ जागांपैकी भाजप ९० पेक्षा अधिक जागा जिंकून स्पष्ट बहुमत मिळवेल, असा अंदाज आहे. प्राबच्या सर्वेक्षणानुसार भाजपला तब्बल ९१ जागा मिळण्याची शक्यता असून, राष्ट्रवादी काँग्रेसला ४३ जागांवर समाधान मानावे लागू शकते. शिवसेना ठाकरे गटाला केवळ ७, तर काँग्रेसला ८ जागा मिळतील, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. या आकडेवारीमुळे पुण्यात अजित पवारांच्या राष्ट्रवादीला ‘दे धक्का’ बसल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
याचबरोबर पिंपरी-चिंचवड महापालिकेतही भाजपचीच सत्ता येण्याचा अंदाज प्राबने वर्तवला आहे. विशेष म्हणजे याआधी झालेल्या विधानसभा निवडणुकांमध्येही प्राबने भाजप महायुतीच्या बाजूने अंदाज वर्तवला होता आणि प्रत्यक्ष निकाल त्याहून मोठ्या यशाचे ठरले होते. त्यामुळे महापालिका निवडणुकांबाबतचा हा अंदाज किती खरा ठरतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, मुंबई महापालिकेबाबतही विविध एक्झिट पोल समोर आले आहेत. AXIS माय इंडियाच्या सर्वेक्षणानुसार मुंबई महापालिकेत भाजपला १३१ ते १५१ जागांवर विजय मिळत स्पष्ट बहुमत मिळू शकते. ठाकरे बंधूंना ५८ ते ६८ जागा, काँग्रेसला १२ ते १६, तर इतर पक्षांना ६ ते १२ जागा मिळण्याचा अंदाज आहे. याच धर्तीवर जनमतच्या एक्झिट पोलनुसार भाजप आणि शिवसेना शिंदे गटाच्या युतीला १३८ जागा, ठाकरे-मनसे युतीला ५९, काँग्रेस-वंचित आघाडीला २३, तर इतरांना ७ जागा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.



