मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांकडून विविध यात्रेंचं आयोजन करण्यात येत आहे. सोमवारी 19 ऑगस्ट रोजी ही यात्रा मुंबईत होती. या यात्रेत आमदार नवाब मलिक उपस्थित होते, यामुळे आता मलिक यांचा पाठिंबा महायुतीला असल्याचे स्पष्ट झाले आहे. अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या जनसन्मान यात्रेच्या मंचावर नवाब मलिकांसह त्यांची कन्या सना दिसल्या. विशेष म्हणजे सना मलिक यांना राष्ट्रवादीच्या प्रवक्तेपदाची जबाबदारी देण्यात आली आहे.
अजित पवार म्हणाले, सना मलिक वडिलकीच्या नात्याने माझ्याकडे येत असते. ती तिच्या विधानसभा क्षेत्रातील लोकांची काम घेऊन येत असते. आज मी जाहीर करतो की, सना मलिक ही पक्षाची प्रवक्ता असेल. एक मोठी जबाबदारी आपण तिला देत आहोत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नव्यांना संधी मिळत असते. सनाचे हिंदी, इंग्रजी चांगले आहे, आता मराठीही चांगले होईल, तू घाबरु नको, असेही अजित पवार म्हणाले. यावर बोलताना सना मलिक म्हणाल्या, “वडील जेलमध्ये असताना कट, कारस्थान झाले पण अजितदादा सोबत होते” .
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी नवाब मलिकांच्या राष्ट्रवादीतील प्रवेशाला कडाडून विरोध केला होता. मात्र तरीही अजित पवारांनी फडणवीसांचा विरोध डावलून नवाब मलिकांना जवळ केले. फडणवीसांनी अजितदादांना पत्र लिहित मलिकांबाबत उघड विरोध व्यक्त केला होता. पण आता अजित पवारांनी त्यांच्या विरोधाकडे दुर्लक्ष करत थेट नवाब मलिकांना पक्षीय सभांमध्येच उतरवलं.