रियाध, वृत्तसंस्था | सौदी अरेबियाच्या दौऱ्यावर असलेले भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी आज (दि.२) क्राऊन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांची भेट घेतली. द्विपक्षीय मुद्यांसह काश्मीर व संरक्षण या विषयांवरही दोघांमध्ये चर्चा झाली. जम्मू-काश्मीरसंबंधी भारताने घेतलेला निर्णय आणि भूमिका आम्ही समजू शकतो, असे सौदी अरेबियाने सांगितले. दोन तास चाललेल्या या बैठकीत सौदीची काश्मीर विषयावरील भूमिकाही समजावून सांगण्यात आली.
डोवाल यांनी अबूधाबीचे क्राऊन प्रिन्स मोहम्मद बिन झायेद अल नाहयान यांची सुद्धा भेट घेतली. आखातामधील हे दोन प्रमुख देश आहेत. भारताचे सौदी आणि यूएईमध्ये घनिष्ट संबंध आहेत. यामध्ये गुप्तचर माहितीची सुद्धा देवाण-घेवाण केली जाते. त्यामुळे परस्पर हिताच्या आणि महत्वाच्या विषयांवर या भेटीत चर्चा झाली.
जम्मू-काश्मीरमधून कलम ३७० हटवण्याच्या निर्णयामागची भारताची भूमिका पटवून देण्यासाठी भारताने सौदी अरेबियाच्या सर्वोच्च नेतृत्वाशी चर्चा केली. काश्मीर मुद्दावर मोहम्मद बिन सलमान यांचा पाठिंबा मिळवण्यासाठी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान सुद्धा रियाधमध्ये थांबले होते. काश्मीर मुद्दावर पाकिस्तानची बाजू त्यांनी मांडली. त्या पार्श्वभूमीवर डोवाल यांचा दौरा महत्वाचा आहे.
डोवाल यांच्या दौऱ्यातून सौदी बरोबरचे द्विपक्षीय संबंध भारतासाठी किती महत्वाचे आहेत ते मोदी सरकारने दाखवून दिले. एनएसए अजित डोवाल फक्त मोदींचे विश्वासू सहकारीच नाहीत तर काश्मीरमधून कलम ३७० हटवल्यानंतर स्वत: त्यांनी तिथे तळ ठोकला होता व अधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले होते. त्यामुळे डोवाल यांचा सौदी दौरा भारतासाठी महत्वाचा आहे. काश्मीरमधून कलम ३७० रद्द करणे हा भारताचा कसा अंतर्गत विषय आहे ? हा निर्णय कसा कायदेशी मार्गाने घेण्यात आला? त्याचा संपूर्ण देशाला कसा फायदा आहे ? हे डोवाल सौदीच्या नेतृत्वाला समजावून सांगितले.
संयुक्त राष्ट्रात पाकिस्तानला विशेष यश मिळाले नसले तरी पाकिस्तानने कुटनितीक मार्गाने मलेशिया, टर्कीचा पाठिंबा मिळवला. चीन आधीच पाकिस्तान सोबत होता. यात महत्वाची गोष्ट म्हणजे सौदी अरेबिया आणि संयुक्त अरब अमिरातीबरोबर पाकिस्तानचे घनिष्ट संबंध असूनही ते मात्र तटस्थ राहिले.