बारामती-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज वृत्तसेवा। महाराष्ट्राच्या राजकारणाला हादरवणाऱ्या घटनेनंतर आता राज्य आपल्या ‘लाडक्या दादांना’ अखेरचा निरोप देण्यासाठी सज्ज झाले आहे. उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांच्या विमान अपघाती निधनाने संपूर्ण महाराष्ट्र शोकसागरात बुडाला असून, उद्या 29 जानेवारी 2026 रोजी त्यांच्या कर्मभूमी बारामती येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

28 जानेवारी 2026 रोजी अजित पवार यांचे दुर्दैवी निधन झाल्याची बातमी समोर येताच राज्यभरात शोककळा पसरली. राजकीय, सामाजिक आणि प्रशासकीय क्षेत्रातून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. महाराष्ट्राच्या विकास प्रक्रियेत महत्त्वाची भूमिका बजावणारे, धडाडीचे आणि निर्णयक्षम नेतृत्व हरपल्याची भावना सर्वत्र व्यक्त होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, उद्या 29 जानेवारी रोजी अजित पवार यांच्या पार्थिवाची अंत्ययात्रा काढण्यात येणार असून, अंत्यदर्शनासाठी त्यांचे पार्थिव बारामतीतील विद्या प्रतिष्ठानच्या मैदानावर आणले जाणार आहे. दुपारी 4 वाजेपर्यंत नागरिकांना आणि कार्यकर्त्यांना अंत्यदर्शन घेता येणार असून, त्यानंतर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार विधी पार पडणार आहेत. या वेळी त्यांना ‘गार्ड ऑफ ऑनर’ देऊन मानवंदना दिली जाणार आहे.
या दुःखद प्रसंगी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे बारामतीत उपस्थित राहणार असल्याची माहिती आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आधीच सोशल मीडियावर शोक व्यक्त करत शरद पवार यांना सांत्वनपर दूरध्वनी केला होता. उद्या ते प्रत्यक्ष बारामतीत येऊन अजित पवार यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेणार आहेत. त्यांच्या सोबत केंद्रातील आणि राज्यातील अनेक वरिष्ठ नेतेही उपस्थित राहणार आहेत.
या पार्श्वभूमीवर बारामती शहरात कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली असून, संपूर्ण परिसरात ‘नो फ्लाय झोन’ लागू करण्यात आला आहे. लाखो नागरिक आणि कार्यकर्ते उपस्थित राहण्याची शक्यता लक्षात घेता प्रशासन सज्ज झाले आहे. वाहतूक, कायदा-सुव्यवस्था आणि आपत्कालीन सेवा यांसाठी विशेष नियोजन करण्यात आले आहे.
महाराष्ट्रात अजित पवार यांची ओळख ‘लाडके दादा’ अशी होती. सामान्य जनता, शेतकरी, कार्यकर्ते आणि युवकांमध्ये त्यांना अपार प्रेम मिळाले. त्यांच्या जाण्याची बातमी मिळताच अनेक कार्यकर्ते आणि समर्थक बारामतीच्या दिशेने रवाना झाले असून, उद्या लाखोंच्या संख्येने जनता उपस्थित राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
सध्या बारामती शहरात शोकाकूल वातावरण असून, रस्तोरस्ती, चौकाचौकात अजित पवार यांच्या आठवणींना उजाळा दिला जात आहे. अनेकांच्या डोळ्यांत अश्रू असून, लाडक्या दादांना अखेरचा निरोप देताना महाराष्ट्राची भावना भारावून गेली आहे.



