नवी दिल्ली वृत्तसंस्था । टेलिकॉम कंपन्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी नाविन्यपूर्ण आणि फायदा देणा-या योजना बाजारात आणत आहेत. एअरटेल आपल्या इतर योजनांमध्ये जुने फायदे देऊन अधिकाधिक ग्राहकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करीत असून एअरटेलने ग्राहकांसाठी २७९ आणि ३७९ रुपयांचे दोन नवीन प्रीपेड प्लान बाजारात आणले आहेत. या प्लानमुळे ग्राहकांना अनेक फायदे होणार आहेत. कंपनीने जुन्या २४९ रुपयांचा प्लान ३० रुपयांनी महाग केला आणि ४ लाख रुपयांच्या जीवन विम्याचीही त्यात भर घातली आहे.
३७९ रुपयांच्या प्लानचे फायदे :-
एअरटेलच्या या नव्या प्लानमध्ये ग्राहकांना ८४ दिवसांची व्हॅलिडिटी देण्यात येत आहे. या प्लानला एफओपीची मर्यादा देण्यात आलेली नाही. आणि आता कोणत्याही नेटवर्कसाठी ट्रू अनलिमिटेड कॉलिंगची ऑफर देत आहे. संपूर्ण व्हॅलिडीटी कालावधीसाठी या प्लानमध्ये एकूण ९०० विनामूल्य एसएमएस देण्यात आले आहेत. हा प्लान सबस्क्राइब करणाऱ्या ग्राहकाला कंपनी विंक म्युझिक, एअरटेल एक्सट्रीम अॅपची फ्री सबस्क्रिप्शन आणि फास्टॅगच्या खरेदीवर १०० रुपये कॅशबॅक असे अनेक फ्री बेनिफिट्स देत आहे.
२७९ रुपयांच्या प्लानचे फायदे :-
दर वाढीनंतर २४९ रुपयांचा प्लानची किंमत आता २७९ इतकी झाली आहे. यात ग्राहकाला दररोज १.५ जीबी डेटा, १०० फ्री एसएमएस आणि अनलिमिटेड फ्री कॉलिंग देण्यात येत आहे. या प्लानची वैधता २८ दिवसांची आहे. २७९ रुपये इतकी किंमत असलेल्या या प्लानची सर्वात खास बाब म्हणजे यात एचडीएफसी लाइफकडून ४ लाख रुपयांचा जीवन विमा देण्यात येत आहे. २४९ रुपयांच्या प्लानमध्ये मात्र ग्राहकांना विमा मिळत नाहीत. या प्लानमध्ये ग्राहकाला विंक म्यूझिक, एअरटेल एक्सट्रीम अॅपची प्रीमियम सबस्क्रिप्शन आणि फास्टॅग खरेदीवर १०० रुपये कॅशबॅक मिळत आहे.