
पिंपरी (वृत्तसंस्था) विश्व हिंदू परिषदेतील मुलींनी एअर रायफलचे ट्रिगर दाबत, हातात तलवारी मिरवत शोभा यात्रा काढल्याचा धक्कादायक प्रकार पिंपरी चिंचवडमध्ये घडला आहे. दरम्यान, या प्रकरणी विश्व हिंदू परिषदेचे अध्यक्ष शरद इनामदार, जिल्हा कार्याध्यक्ष धनाजी शिंदे, जिल्हा मंत्री नितीन वाटकर आणि 200 ते 250 कार्यकर्त्यांवर विविध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विश्व हिंदू परिषदेच्या वतीने रविवारी सांयकाळी 5 ते रात्री 10 वाजेच्या सुमारास यमुनानगर येथील अंकुश चौक ते ठाकरे मैदान दरम्यान दुर्गा वाहिनीची शोभा यात्रा काढण्यात येत होती. या शोभा यात्रेत साधारण 200 ते 250 कार्यकर्ते सहभागी झाले होते. या शोभा यात्रेत चार मुलींच्या हातात एअर रायफल असल्याचे निदर्शनात आले. तसेच या वेळी एअर रायफलचे ट्रिगर दाबल्याने मोठा आवाजही आला. त्याचबरोबर पाच मुली हातात तलवारी मिरवत असल्याचेही समोर आले आहे. दरम्यान, या प्रकरणी निगडी पोलीस स्टेशनमध्ये आर्म अॅक्टचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. परंतू अद्यापपर्यंत कोणालाही अटक करण्यात आलेली नाहीय.