Home पर्यावरण मुंबईपेक्षा उपनगरात हवा अधिक खराब; अहवालातून धक्कादायक चित्र

मुंबईपेक्षा उपनगरात हवा अधिक खराब; अहवालातून धक्कादायक चित्र


मुंबई-वृत्तसेवा | मुंबई शहर प्रदूषणाचे केंद्र मानले जात असले तरी ताज्या हवा गुणवत्ता निर्देशांकाच्या (AQI) आकडेवारीने वेगळे चित्र समोर आणले आहे. शहराच्या मध्यवर्ती भागांपेक्षा उपनगर आणि लगतच्या नवी मुंबई परिसरात हवेची गुणवत्ता अधिक घसरल्याचे स्पष्ट झाले आहे. एकूण २७ ठिकाणी ‘खराब’ ते ‘अतिखराब’ श्रेणीतील हवेची नोंद झाली असून, यातील बहुतांश ठिकाणे उपनगरात किंवा औद्योगिक आणि वाहतूकदृष्ट्या संवेदनशील भागात आहेत.

नवी मुंबईतील नेरूळ येथे सर्वाधिक २०३ AQI नोंदवण्यात आला. छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळ परिसरात १७९, तर महापे येथे १७२ AQI नोंदला गेला. या आकडेवारीवरून शहराच्या मध्यवर्ती भागांच्या तुलनेत उपनगरांमध्ये नागरिकांना अधिक प्रदूषित हवेचा सामना करावा लागत असल्याचे दिसून येते.

वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स येथे १७०, घाटकोपर १५४, मालाड पश्चिम १५०, नेव्ही नगर कुलाबा १४९, भायखळा १४७, मझगाव १३८, कांदिवली पूर्व १३७, बांद्रा पूर्व १३५, सायन १३३ आणि कुर्ला १३१ असा AQI नोंदवण्यात आला आहे. ही सर्व ठिकाणे ‘मध्यम ते खराब’ श्रेणीत मोडतात.

तज्ज्ञांच्या मते, उपनगरांतील वाढती लोकसंख्या, मोठ्या प्रमाणावरील बांधकामे, मेट्रो आणि रस्ते प्रकल्प, वाहनांची वाढती संख्या तसेच औद्योगिक पट्ट्यांमधील उत्सर्जन ही प्रदूषण वाढण्यामागची प्रमुख कारणे आहेत. शहराच्या मध्यभागी काही नियंत्रणात्मक उपाययोजना केल्या जात असल्या तरी उपनगरांमध्ये त्यांचा प्रभाव कमी जाणवत आहे.

हवेची गुणवत्ता अशीच घसरत राहिल्यास श्वसनाचे आजार, दमा आणि हृदयविकाराच्या समस्यांमध्ये वाढ होण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे शहरासोबतच उपनगरांवरही तितक्याच गांभीर्याने लक्ष केंद्रीत करून प्रदूषण नियंत्रणासाठी ठोस आणि सातत्यपूर्ण उपाययोजना राबविण्याची गरज असल्याचे मत व्यक्त होत आहे.


Protected Content

Play sound