मुंबई-वृत्तसेवा । ठाणे महापालिका निवडणुकीतील विजयानंतर केलेल्या वादग्रस्त विधानामुळे चर्चेत आलेल्या एमआयएमच्या नवनिर्वाचित नगरसेविका सहर शेख यांनी अखेर पोलिसांकडे लेखी माफीनामा सादर केला आहे. त्यांच्या विधानाचे तीव्र पडसाद उमटल्यानंतर ही कारवाई करण्यात आली असून, संबंधित तक्रारदारांनाही याबाबत माहिती देण्यात आली आहे.

निवडणूक विजयाच्या पार्श्वभूमीवर सहर शेख यांनी “कैसा हराया, अभी हम लोगों को मुंब्रा को पूरा हरा कर देना है” असे विधान केले होते. या वक्तव्याचा अर्थ धार्मिक रंगाशी जोडत काही संघटनांनी आक्षेप घेतला होता. भाजप नेते किरीट सोमय्या, आमदार निरंजन डावखरे तसेच बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषदेकडून पोलिसांत तक्रारी दाखल करण्यात आल्या होत्या.

या तक्रारींची दखल घेत मुंब्रा पोलिसांनी सहर शेख यांची चौकशी केली. त्यानंतर त्यांनी 23 जानेवारी रोजी लेखी माफीनामा दिल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक अनिल शिंदे यांनी दिली. किरीट सोमय्या यांनीही पोलिस ठाण्यात भेट देऊन प्रकरणाचा आढावा घेतला होता.
माफीनाम्यात सहर शेख यांनी आपल्या विधानाचा विपर्यास करण्यात आल्याचा दावा केला आहे. “सभेत वापरलेले वाक्य हे पक्षाचा झेंडा आणि निशाणीच्या संदर्भात होते. कुणाच्याही भावना दुखावण्याचा किंवा सामाजिक वातावरण बिघडवण्याचा हेतू नव्हता. आम्ही तिरंग्यासाठी जगू आणि तिरंग्यासाठीच मरू,” असे त्यांनी स्पष्ट केले आहे.
तसेच, “माझ्या विधानामुळे कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी जाहीर आणि लेखी स्वरूपात माफी मागते,” असेही त्यांनी नमूद केले आहे.
सहर शेख यांचा माफीनामा स्वीकारल्यानंतर पोलिसांनी हे प्रकरण दप्तरी नोंदवले आहे. भविष्यात अशा प्रकारचे वादग्रस्त किंवा सामाजिक सलोखा बिघडवणारे विधान झाल्यास संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही पोलिसांनी दिला आहे. या घडामोडींमुळे मुंब्रा परिसरातील राजकीय वातावरण काही काळ तापले होते. मात्र माफीनाम्यानंतर या प्रकरणावर पडदा पडण्याची चिन्हे दिसत आहेत.



