चाळीसगाव (प्रतिनिधी) पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचा २९४ वा जयंती उत्सव दि. ३१ मे रोजी साजरा करण्यात येणार आहे. या दिवशी सकाळी ९.०० वाजता धनगर समाजातील ज्येष्ठ नागरिक भगवान साबळे यांच्या हस्ते सपत्निक अहिल्यादेवी यांच्या पुतळ्याचे पूजन करण्यात येणार आहे. यासंदर्भात धनगर समाजाची नुकतीच एक बैठक अहिल्यादेवी नगर येथील समाज भवनामध्ये त्र्यंबक अगोणे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. त्यावेळी उत्सव समितीची स्थापना करण्यात येवून अध्यक्षपदी पांडुरंग बोराडे, उपाध्यक्ष रवींद्र अगोणे व सचिव योगेश साबळे यांची निवड करण्यात आली.
या बैठकीस धनगर समाज मंडळाचे अध्यक्ष पोपट अगोणे, सचिव रमेश जानराव, सदस्य साहेबराव अगोणे, बापूराव सोनवणे, देविदास अगोणे, साईनाथ देवरे, प्रमोद अगोणे यांच्यासह बरेच सदस्य व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. उत्सव समितीच्या माध्यमातून २ जून रोजी सकाळी ९.०० वाजता शहरांमध्ये मोटारसायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे सायंकाळी ५.०० वाजता मान्यवरांच्या हस्ते अहिल्यादेवी यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात येऊन शहरातील प्रमुख मार्गावरून मिरवणुक काढण्यात येणार आहे. याशिवाय इतर उपक्रम घेण्यात येणार आहेत. तरी वरील सर्व कार्यक्रमांना समाज बांधवांसह नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन धनगर समाज उन्नती मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.