अमळनेर (प्रतिनिधी) अहिल्याबाई होळकर यांनी आपल्या राज्यातील लोकांना जाती किंवा धर्माच्या नावाखाली अस्पृश्यता पाळण्यावर बंदी घातली. सर्वांना समान शिकवण दिली. त्यामुळेच अहिल्याबाई होळकर यांचे कार्य देशाला दिशा देणारे असल्याचे प्रतिपादन ओबीसी शिक्षक असोसिएशनच्या महिला जिल्हाध्यक्षा वसुंधरा दशरथ लांडगे यांनी केले. त्या अहिल्याबाई होळकर २९४ व्या जयंती निमित्ताने आयोजित कार्यक्रमात बोलत होत्या.
अमळनेर येथे आज ओबीसी शिक्षक असोसिएशन ,मुख्याध्यापक संघ, माध्यमिक शिक्षक संघ व धनगर समाज मंच यांच्यावतीने बसस्थानकासमोर अहिल्याबाई होळकर यांच्या २९४ व्या जयंती निमित्ताने आज कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी वसुंधरा लांडगे पुढे म्हणाल्या की, शिक्षणाचे महर्षी महात्मा ज्योतिराव फुले यांनी आपल्या शाळेचे नाव अहिल्या आश्रम हे ठेवले. तर आरक्षणाचे जनक राजर्षी शाहू महाराज यांनी अहिल्याबाई यांच्या नावाने दवाखाना काढला. यावरूनच अहिल्याबाई यांची उंची किती मोठी होती, हे दिसते. अहिल्याबाईंनी वृक्षसंवर्धनाला अधिक महत्त्व देत प्रत्येक व्यक्तीने पाच झाडे लावली पाहीजे, असा कायदाच केला. असा कायदा करणाऱ्या देशातल्या हिल्याबाई होळकर या पहिल्या महिला होत्या. त्यांचे कार्य देशाला प्रेरणादायी आहे.
सानेगुरुजी माध्यमिक पतपेढीचे संचालक तुषार पाटील म्हणाले की, वकृत्व,कर्तुत्व, दातृत्व यांचा त्रिवेणी संगम म्हणजे अहिल्याबाई होळकर होय. अहिल्याबाई होळकर यांनी आंतरजातीय विवाहाला प्राधान्य देऊन त्याची सुरुवात स्वतःच्या घरापासून केली. हुंडाविरोधी कायदा केला असे त्यांनी सांगितले. कार्यक्रमास ओबीसी शिक्षक असोसिएशनचे ज्येष्ठ सल्लागार दशरथ लांडगे, प्रा.आर.जी.सोनवणे, मुख्याध्यापक संघाचे माजी अध्यक्ष प्रकाश पाटील, मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष पाटील, ओबीसी शिक्षक असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष ईश्वर महाजन, गायकवाड हायस्कूलचे पर्यवेक्षक एस.सी तेले, कलाध्यापक संघाचे ज्येष्ठ सल्लागार आर.डी चौधरी, बी एम सांगोरे ,आर.पी. धनगर ,विठोबा साबे ,गोकुळ पाटील, हिरालाल पाटील, विजय चौधरी ,राजवड हायस्कूलचे मुख्याध्यापक सूर्यवंशी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एस.सी. तेले यांनी केले. तर आभार प्रदर्शन आर.पी धनगर यांनी मानले. यावेळी विविध समाजातील मान्यवर मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.