Home प्रशासन मुक्ताईनगरात शेतरस्ता पूर्ववत सुरु करावा अन्यथा आंदोलन

मुक्ताईनगरात शेतरस्ता पूर्ववत सुरु करावा अन्यथा आंदोलन


मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । निमखेडी बोदवड रोड ते हरताळा चक्रधर स्वामी मंदिर तलाव परिसराकडे जाणारा वन विभागाच्या हद्दीतील शेतरस्ता अनेक वर्षांपासून बंद ठेवण्यात आल्याने ग्रामस्थ, शेतकरी आणि भाविकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. वारंवार निवेदने देऊनही वन विभागाकडून कोणतीही ठोस कार्यवाही न झाल्याने प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

हरताळा येथील निमखेडी नर्सरी परिसरातून जाणारा हा रस्ता पूर्वी स्थानिकांच्या दैनंदिन वापरात होता. शेतकऱ्यांची शेतीकामे, ग्रामस्थांची ये-जा तसेच मंदिरात जाणाऱ्या भाविकांसाठी हा मार्ग अत्यंत सोयीचा होता. मात्र कोणतीही पर्यायी व्यवस्था न करता हा रस्ता अचानक बंद करण्यात आल्याने नागरिकांना मोठा फेरा मारावा लागत आहे. त्यामुळे वेळ आणि इंधनाचा अतिरिक्त खर्च सहन करावा लागत असून दैनंदिन व्यवहारांवर परिणाम होत आहे.

दर शनिवारी, मंगळवारी तसेच विशेष धार्मिक कार्यक्रमांच्या दिवशी हजारो भाविक हरताळा येथील हनुमान मंदिर आणि श्रीकृष्ण/चक्रधर स्वामी मंदिरात दर्शनासाठी येतात. याच परिसरात श्रावण बाळ यांच्या समाधीचे मंदिरही आहे. रस्ता बंद असल्यामुळे वाहतुकीची कोंडी, अपघाताचा धोका आणि गोंधळाची परिस्थिती निर्माण होत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. धार्मिक स्थळांकडे जाणाऱ्या मार्गावर अशी अडचण निर्माण होणे ही गंभीर बाब असल्याची भावना व्यक्त केली जात आहे.

माजी विशेष कार्यकारी अधिकारी अतुल अरुण जावरे यांनी वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांना लेखी निवेदन देऊन संबंधित रस्ता पूर्ववत सुरू करण्याची मागणी केली आहे. मात्र अद्याप वन विभागाकडून कोणतीही सकारात्मक भूमिका घेण्यात आलेली नाही. त्यामुळे वन विभागाच्या कार्यपद्धतीवर स्थानिकांकडून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.

विशेष म्हणजे जळगाव येथील उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ गेट परिसरातील रस्ता वन विभागाच्या हद्दीत असूनही तो खुला ठेवण्यात आला आहे. मग हरताळा परिसरातील रस्त्यासाठी वेगळा निकष का लावला जात आहे, असा सवाल ग्रामस्थ उपस्थित करत आहेत. नियमांची अंमलबजावणी करताना दुहेरी भूमिका घेतली जात असल्याचा आरोपही केला जात आहे.

पर्यावरण संवर्धनाच्या नावाखाली स्थानिकांची गैरसोय करणे योग्य नसून वन विभागाने तात्काळ बैठक घेऊन तोडगा काढावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे.


Protected Content

Play sound