जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे हे विधानसभा अधिवेशन सुरू असताना रमी गेम खेळत असल्याचा एक व्हिडिओ व्हायरल झाल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणी अखिल भारतीय छावा संघटनेने तीव्र संताप व्यक्त करत, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख अजितदादा पवार यांनी कोकाटे यांचा तात्काळ राजीनामा घ्यावा आणि त्यांना घरी पत्ते खेळायला पाठवावे, अशी मागणी केली आहे.
‘छावा’ संघटनेने म्हटले आहे की, जनतेने शेतकऱ्यांच्या हिताचे काम करण्यासाठी कोकाटे यांना निवडून दिले आहे, परंतु ते अशा बेजबाबदारपणे वागत आहेत. यापूर्वीही, “शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली तर ते त्यांच्या मुला-मुलींची लग्नकार्य आणि साखरपुडे करतात,” असे वादग्रस्त वक्तव्य कृषीमंत्री कोकाटे यांनी केले होते. या दोन्ही घटनांमुळे शेतकऱ्यांबद्दल त्यांच्या असंवेदनशील दृष्टिकोन स्पष्ट होत असल्याचे ‘छावा’ संघटनेने म्हटले आहे.

दरम्यान, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष लातूर येथे आलेले असताना, त्यांना निवेदन देण्यासाठी अ. भा. छावा संघटनेचे विद्यार्थी आघाडीचे प्रदेशाध्यक्ष काही कार्यकर्त्यांसह गेले होते. यावेळी अजित पवार गटाचे सुरेश चव्हाण आणि इतर काही गुंड प्रवृत्तीच्या कार्यकर्त्यांनी छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांवर अमानुषपणे हल्ला केल्याचा आरोप ‘छावा’ संघटनेने केला आहे. या हल्लेखोरांवर तात्काळ गुन्हे दाखल करण्याची मागणी छावा संघटनेने केली आहे.
जर या प्रकरणी गुन्हे दाखल झाले नाहीत, तर छावा संघटना संपूर्ण महाराष्ट्रात रस्त्यावर उतरून आंदोलन करेल आणि त्यामुळे होणाऱ्या सर्व परिणामांना महाराष्ट्र सरकार जबाबदार राहील, असा स्पष्ट इशाराही अखिल भारतीय छावा संघटनेने दिला आहे. जळगाव येथील अखिल भारतीय छावा संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजू कुमावत, पारोळा तालुकाध्यक्ष विजय पाटील, धरणगाव तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर पाटील, एरंडोल तालुकाध्यक्ष उमेश पाटील, आयटी विभाग प्रमुख केतन पाटील, राजू पाटील, व्यापारी आघाडीचे सुरेश पाटील यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.



