नाशिक-प्रतिनिधी | मला रमी खेळता येत नसून माझा मोबाईल क्रमांक याच्याशी अटॅच झालेला नाही असे नमूद करत आपली बदनामी करणाऱ्यांच्या विरोधात दावा दाखल करणार असल्याचे प्रतिपादन कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी केले. आजच्या पत्रकार परिषदेत त्यांनी सर्व आरोपांना नाकारत विरोधकांवर टिका केली.
कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी आज नाशिकमध्ये पत्रकार परिषद घेतली. यात प्रारंभी त्यांनी मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त कृषी खात्याने नवीन योजना सादर केल्याची माहिती दिली. याप्रसंगी त्यांनी आपल्यावरील आरोपांवर भाष्य केले. कोकाटे म्हणाले की, हा अतिशय लहान प्रकार असून याला वाढून दाखविण्यात आले. माझा मोबाईल फोन हा रमी खेळणाऱ्या ॲपशी संलग्न नाही. तसेच मला रमी खेळताच येत नाही. यामुळे या प्रकरणात आपण निर्दोष असल्याचे कोकाटे म्हणाले.

कृषीमंत्री कोकाटे पुढे म्हणाले की, विरोधकांनी या प्रकरणी नाहक माझी बदनामी केली आहे. या सर्वांना मी बदनामीच्या दाव्यातून कोर्टात खेचणार असल्याचे सांगितले. तसेच या प्रकरणी आपण दोषी असल्यास हिवाळी अधिवेशनात मुख्यमंत्री वा उपमुख्यमंत्र्यांनी निर्देश दिल्यास आपण तात्काळ राजीनामा देणार असल्याचे त्यांनी याप्रसंगी नमूद केले. तर या पत्रकार परिषदेत त्यांनी आधींच्या कथित वादग्रस्त प्रकरणांचे समर्थन देखील केले. राजीनामा देण्यासारखे काहीही घडले नसल्याने आपण राजीनामा देणार नसल्याचे याप्रसंगी सांगितले.
या पत्रकार परिषदेत माणिकराव कोकाटे यांनी आपण तूर्तास राजीनामा देणार नसल्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत. यामुळे त्यांना सध्या तरी अभय मिळाल्याचे दिसून येत आहे. तर या पत्रकार परिषदेत त्यांनी प्रसारमाध्यमांवर देखील तोंडसुख घेतले. मीडियाने सकारात्मक बाजू दाखविण्याचा सल्ला देखील त्यांनी याप्रसंगी केला. आपण या प्रकरणाबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना माहिती दिली नाही, कारण त्यांचा मोबाईल स्वीच ऑफ असल्याचे अजब कारण देखील त्यांनी याप्रसंगी दिले.



