अमरावती-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा । जिल्ह्यात गेल्या काही दिवसांत अवकाळी पावसाने शेतीचे मोठे नुकसान केले असून या पावसाचा फटका चांदूर बाजार, अचलपूर आणि धारणी तालुक्याला बसला. या तालुक्यांमध्ये २६ हजार ८८९ हेक्टरमधील कापूस आणि तूर पिकांचे नुकसान झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनाच्या अहवालातून देण्यात आली आहे.
चांदूर बाजार तालुक्यात ६ हजार ३०४ हेक्टरमधील शेतपिकांचे नुकसान झाले असून त्यात ४ हजार ३०० हेक्टरमधील कपाशी आणि २००३ हेक्टरमधील तूर पीक उध्वस्त झाले आहे. अचलपूर तालुक्यात कापूस आणि तूर पिकासह २० हजार ७७ हेक्टरमधील शेतपिकांचे नुकसान झाले आहे, तर धारणी तालुक्यातील ५०८ हेक्टरमधील पिके अवकाळी पावसामुळे पाण्यात गेली आहेत. अवकाळी पावसादरम्यान चिखलदरा, नांदगाव खंडेश्वर आणि अचलपूर तालुक्यातील एकूण ३ घरांची पडझड झाल्याची नोंद या अहवालात घेण्यात आली आहे.