जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञान व कौशल्य आत्मसात केल्यास कृषि व कृषि प्रक्रिया क्षेत्रात रोजगाराच्या भरीव संधी उपलब्ध होतील असे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधताना सांगितले. सुशासन सप्ताह निमित्त ‘ प्रशासन गाव की ओर मोहिमेअंतर्गत ‘ जळगाव तालुक्यातील भादली बु. येथे उच्चशिक्षित तरुण शेतकरी योगेश झांबरे यांनी प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेअंतर्गत उभारलेल्या आटा प्लांट व प्राथमिक प्रक्रिया केंद्राची पाहणी वेळी जिल्हाधिकारी यांनी स्थानिक शेतकऱ्यांशी ग्राम पातळीवर उपलब्ध झालेल्या सुविधांबाबत चर्चा केली. त्यावेळी ते बोलत होते.
शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून तरुण शेतकऱ्यांनी व सुशिक्षित बेरोजगारांनी प्राथमिक प्रक्रिया केंद्र गाव पातळीवर स्थापन केल्यास शेतकऱ्यांची सोय होऊन स्थानिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. याकरिता जिल्हा प्रशासन व कृषि विभाग कटिबद्ध असून खंबीरपणे शेतकऱ्यांच्या सोबत असल्याचे जिल्हाधिकारी यांनी अश्वस्त केले.
आसोदा येथे इफको कंपनी मार्फत शेतकऱ्यांना ड्रोन द्वारे नॅनो युरिया व नॅनो डीएपी फवारणीचे प्रात्यक्षिक आयोजित करण्यात आले होते. या ठिकाणी शेतकऱ्यांना ड्रोन वापरा बाबतची माहिती, सुशिक्षित तरुणांना उपलब्ध असलेल्या रोजगाराच्या संधी बाबत चर्चा करण्यात आली तसेच इफको मार्फत जळगाव जिल्ह्यात 12 ड्रोन उपलब्ध करून देण्यात आले असून या माध्यमातून शेतकऱ्यांना आपल्या प्रक्षेत्रात फवारणी करता सदरचे ड्रोन उपलब्ध असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. या ठिकाणी नवनिर्मिती शेतकरी मंडळ, आसोदा मार्फत भौगोलिक मानांकन प्राप्त भरीताची वांगी प्रक्षेत्राची पाहणी करून पारंपारिक पद्धतीने जतन केलेल्या भरीताच्या वांगी वाणाची माहिती घेऊन या ठिकाणी डॉ. पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशन अंतर्गत शेतकऱ्यांनी आपल्या प्रक्षेत्रात तयार केलेल्या जैविक निविष्ठाची जिल्हाधिकारी यांनी पाहणी केली.
यावेळी अप्पर जिल्हाधिकारी श्री.अंकुश पिनाटे, निवासी उपजिल्हाधिकारी भीमराज दराडे,जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कुर्बान तडवी, इफको महाराष्ट्र विपणन मॅनेजर उदय तिजारे, विषय विशेषज्ञ वैभव सूर्यवंशी, इफकोचे संदीप रोकडे, मंडळ कृषी अधिकारी शरद पाटील, अमित भामरे, विनोद झवर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मिलिंद चौधरी, भादली बू. सरपंच मनोज चौधरी, नवनिर्मिती शेतकरी मंडळाचे अध्यक्ष किशोर चौधरी, अरुण सपकाळे, प्रभाकर चिरमाडे, महेश भोळे, संजय ढाके व परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.