जळगाव (प्रतिनिधी) सनातन संस्थेचे अधिवक्ता संजीव पुनाळेकर व विक्रम भावे यांना त्वरित मुक्त करावे, या मागणीसाठी हिंदू जनजागृती समितीतर्फे आज महापालिकेच्या मुख्य द्वाराजवळ आंदोलन करण्यात आले. यावेळी पुनाळेकर यांना १० महिन्यांपूर्वी एका संशयित आरोपींनी दिलेल्या जबाबावरून अटक करण्यात आल्याचे समजत असल्याने सीबीआयने केलेली ही कारवाई अत्यंत चुकीची असून निषेधार्ह असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला.
या प्रसंगी करण्यात आलेल्या प्रमुख मागण्या अशा आहेत. संपूर्ण प्रकरणाची नि:ष्पक्ष चौकशी करण्यात यावी, तसेच या प्रकारातील सीबीआयच्या भूमिकेचा तपास करण्यात यावा, सीबीआयचे अधिकारी नंदकुमार नायर यांच्याकडून डॉक्टर दाभोळकर प्रकरणाचा तपास सोडून तो अन्य अधिकाऱ्याकडे सोपवण्यात यावा, अथवा तो तपास न्यायालयाच्या देखरेखीखाली करण्यात यावा, संजीव पुनाळेकर व विक्रम भावे यांची होत असलेली मानहानी थांबवावी, सीबीआयचा पूर्व इतिहास पाहता हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्त्यांना कपटाने पकडल्याची उदाहरणे आहेत, यावेळीही तशी शक्यता नाकारता येत नाही, तरी वरील सर्व गोष्टी पाहता संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावे यांना त्वरित मुक्त करावे, आदी मागण्या करण्यात आल्या आहेत.