बारामती – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज वृत्तसेवा । बारामतीत आज सकाळी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सहयोग निवासस्थानाबाहेर अघोरी पूजेचा संशयित प्रकार उघडकीस येताच शहरात खळबळ उडाली. फोडलेले नारळ, फुले, हळद-कुंकू, कापलेले लिंबू आणि नैवेद्य रस्त्याच्या मधोमध ठेवलेले दिसून आल्यानंतर हा प्रकार जादूटोणा किंवा भानामतीशी संबंधित असल्याची चर्चा वेगाने पसरली. निवडणुकीच्या तोंडावर अशाप्रकारची घटना घडल्याने राजकीय वर्तुळातही खळबळ माजली आहे.
सकाळी मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडलेल्या नागरिकांनी सहयोग सोसायटीसमोर हा प्रकार पाहताच तातडीने परिसरात चर्चा सुरू झाली. त्यांनी पोलिसांना कल्पना दिल्यानंतर घटनास्थळी पोलीस पथक दाखल झाले आणि पंचनामा करण्यात आला. नेमका हा प्रकार कोणी व कोणत्या उद्देशाने केला याचा तपास पोलीस सखोलपणे करत आहेत.

निवडणुकीचे वातावरण तापलेले असताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निवासस्थानाबाहेर झालेल्या या संशयित अघोरी पूजेने अनेक प्रश्न निर्माण केले आहेत. तिकीट मिळवण्याच्या राजकीय स्पर्धेत किंवा कुणाचे तिकीट कापण्यासाठी दडपण आणण्याच्या हेतूने असे ‘काहीतरी वेगळे’ केले गेले का, याबाबतही शहरात कुजबुज सुरू आहे. काही नागरिकांच्या मते, हा प्रकार राजकीय हेतूने प्रेरित असू शकतो; तर काहींच्या मते, कुणाच्या वैयक्तिक वादाचा परिणामही असू शकतो.
घटनेनंतर संपूर्ण परिसरात तर्क-वितर्कांना उधाण आले असून पोलिसांनी आसपासच्या सीसीटीव्ही फुटेजची तपासणी सुरू केली आहे. संबंधित व्यक्ती किंवा गट ओळखला जाईपर्यंत कोणत्याही शक्यतेला नाकारता येणार नाही, असे पोलीस सूत्रांचे म्हणणे आहे. शहरातील सर्वच राजकीय पक्षांमध्ये या घटनेची जोरदार चर्चा होत असून नागरिकांमध्येही भीतीचा आणि औत्सुक्याचा माहोल निर्माण झाला आहे.



