पुणे-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | अजित पवार यांनी पुण्यातील गुन्हेगारीबाबत आज आढावा घेत बारामती येथे वाढत्या गुन्हेगारीवर पोलिस अधिकाऱ्यांशी चर्चा केली. त्यानंतर पत्रकारांची संवाद साधला. अल्पवयीन गुन्हेगाराची वयोमर्यादा १४ वर्षाच्या आत ठेवण्याची गरज आहे. कारण पूर्वीची मुलांची बुद्धीमत्ता आणि आजची परिस्थिती वेगळी आहे. या संदर्भात आम्ही गृहमंत्री अमित शहा यांच्याशी चर्चा करणार आहे. कारण हा विषय केंद्रांशी निगडीत आहे. अल्पवयीन गुन्हेगार हा १४ वर्षाच्या खालील गृहीत धरला जावा अशा स्वरूपाची मागणी आम्ही सरकारच्या वतीने करणार असे यावेळी अजित पवार म्हणाले.
पुढे ते म्हणाले की, शालेय विद्यार्थी १४ वर्षाच्या पुढे गेले की त्यांचा वापर हा गुन्हेगारीसाठी केला जात आहे. या मुलांमध्ये रागावर नियंत्रण न ठेवण्याची वृत्ती देखील वाढत आहे. यामुळे गुन्हे वाढत आहेत. दरम्यान, ही मुळे अल्पवयीन असल्याने त्यांच्यावर गुन्हेगाराप्रमाणे कारवाई केली जात नाही. त्यामुळे गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्यासाठी व कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी अल्पवयीन गुन्हेगाराचे वय १४ वर्षाच्या आत असावे. चौदा वर्षाच्या पुढील प्रत्येक युवक हा सराईत अथवा थेट गुन्हेगार गणला जावा अशी सर्वांची भूमिका आहे. अधिकाऱ्यांचं देखील हेच म्हणणे आहे. अल्पवयीन मुलांना आता कळून चुकलं आहे की १८ पर्यंत आपण गुन्हात अडकू शकत नाही. त्यामुळे देखील त्यांची गुन्हेगारी प्रवृत्ती वाढत आहे. या बाबत मी अमित शहांशी बोललो. प्रत्यक्ष भेटल्यावर देखील मी या बाबत त्यांच्याशी चर्चा करणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना देखील याबाबत सांगणार असून आम्ही या बाबत केंद्र सरकारला पत्र देऊन या बाबतचा प्रस्थाव देणार आहे, असे पवार म्हणाले.