चाळीसगाव ( प्रतिनिधी) तालुक्यातील हिंगोणे येथील तितूर नदीपात्रातून होत असलेल्या वाळू चोरीचे प्रकरण नुकतेच ग्रामस्थांनी उघडकीस आणून चोरटी वाहतूक करणाऱ्यांना पकडून दिले होते, यावेळी करण्यात आलेल्या पंचनाम्यात तफावत आढळून आली होती, तसेच अत्यल्प स्वरुपात वाळू चोरी झाल्याचे दाखवत चोरट्यांना अभय देण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. या वाळू तस्करांविरोधात कठोर कारवाईचा बडगा उगारला जावा, तसेच वाळूचा पंचनामा पुन्हा करुन वाळू चोराविरोधात कारवाई करण्यात यावी या मागण्यांसाठी हिंगोणे येथील ग्रामस्थांनी काल ( दि.१ फेब्रुवारी ) पासून उपोषण केले आहे.
आज तालुक्याचे माजी आमदार राजीवदादा देशमुख यांनी भेट देऊन त्यांच्या समस्या जाणून घेतल्या.याबाबत अधिक माहीती अशी की, दिनांक २२ जानेवारी रोजी हिंगोणे गावालगत असलेल्या तितूर नदीपात्रात मोठ्या प्रमाणात वाळू चोरी होत असल्याचा प्रकार ग्रामस्थांनी उघडकीस आणला होता. या प्रकरणात आरोपींना अटक करण्यात आली होती, परंतु एका दिवसाची पोलीस कोठडी मिळाल्यानंतर आरोपीस तात्काळ जामीन मिळाला होता. या प्रकाराने ग्रामस्थ संतापले असून अवैध वाळू उपशामूळे नदीपात्रात जवळपास १५ लक्ष घनफूट म्हणजे सुमारे ३०० कोटी रुपयांची वाळू चोरी झाली आहे. असे असताना महसूल प्रशासनाने या गोष्टीकडे कानाडोळा केल्याने ग्रामस्थ बेमुदत उपोषणाला बसले आहेत. यावेळी तंटामुक्त समितीचे अध्यक्ष सुरेश पाटील, माजी सरपंच ज्ञानेश्वर महाजन, विकास सोसायटीचे चेअरमन सयाजी पाटील, बेलगंगा साखर कारखान्याचे माजी संचालक बाळासाहेब पाटील, दिपक चव्हाण,गोविंद पाटील, सुरेश चव्हाण, दिलीप पाटील, शांताराम चव्हाण, योगेश चव्हाण चव्हाण, रवींद्र पाटील, एकनाथ कोष्टी, धनराज चव्हाण यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपोषणाला बसले आहेत. यावेळी माजी आमदार राजीवदादा देशमुख यांनी भेट दिली तेव्हा समवेत तालुकाध्यक्ष दिनेश पाटील, माजी जि.प.सदस्य मंगेश पाटील, शहराध्यक्ष शाम देशमुख, माजी उपाध्यक्ष भगवान पाटील, नगरसेवक दिपक पाटील, यशवंत पाटील, युवक शहराध्यक्ष अमोल चौधरी, तालुका उपाध्यक्ष शुभम पवार, प्रकाश पाटील, यज्ञेश बाविस्कर, पंजाब देशमुख, सौरभ त्रिभुवन, पिनू सोनवणे व गुंजन मोटे आदी उपस्थित होते.