
मुंबई-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज वृत्तसेवा । शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पक्ष व चिन्हावरील वादाची सुनावणी पुन्हा एकदा पुढे ढकलण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयाने या दोन्ही प्रकरणांची पुढील सुनावणी पुढील वर्षी, 21 जानेवारी 2026 रोजी घेण्यात येणार असल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे या निर्णयाचा निकाल राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पार पडल्यानंतरच लागणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांमध्ये झालेल्या फुटीनंतर पक्षाची वैधता आणि निवडणूक चिन्ह यावरून निर्माण झालेला वाद गेल्या तीन वर्षांपासून सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना पक्ष एकनाथ शिंदे यांचा आणि राष्ट्रवादी पक्ष अजित पवार यांचा असल्याचे घोषित केले होते. या निर्णयाला उद्धव ठाकरे आणि शरद पवार गटांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे.
या प्रकरणाची प्राथमिक सुनावणी 12 नोव्हेंबर रोजी झाली होती. त्यानंतर न्यायालयाने आता पुढील तारीख 21 जानेवारी 2026 निश्चित केली आहे. त्या दिवशी प्रथम शिवसेनेच्या प्रकरणात युक्तिवाद होईल आणि त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रकरण ऐकले जाईल. दोन्ही गटांना त्यांच्या बाजूने मांडणीसाठी दोन तासांचा वेळ देण्यात येणार आहे. सुनावणी सकाळी 11.30 वाजता सर्वोच्च न्यायालयात पार पडेल.
दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका 26 जानेवारी 2026 पूर्वी घेण्याचे आदेश दिले आहेत. सध्या 2 डिसेंबर रोजी नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या निवडणुका होत असून, त्यानंतर जिल्हा परिषद, पंचायत समित्या आणि पुढे महापालिकांच्या निवडणुका होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या पक्ष-चिन्ह वादाचा निकाल या सर्व निवडणुका पार झाल्यानंतरच लागणार असल्याची चिन्हे आहेत.
हा वाद 2022 पासून प्रलंबित आहे. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील गटाने मूळ शिवसेना पक्ष असल्याचा दावा करत धनुष्यबाण हे चिन्ह वापरण्याचा अधिकार मिळवला होता. निवडणूक आयोगाच्या या निर्णयाला उद्धव ठाकरे यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले. त्याचप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर अजित पवार आणि शरद पवार यांच्या गटांमध्येही असा वाद निर्माण झाला.
राज्याच्या राजकारणात या दोन्ही प्रकरणांचे परिणाम दूरगामी ठरणार आहेत. न्यायालयाच्या पुढील सुनावणीपर्यंत दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये अनिश्चिततेचे वातावरण कायम राहणार असून, “पुन्हा तारीख पे तारीख” या संवादाची आठवण पुन्हा एकदा महाराष्ट्रात होत आहे.



