आमदारांच्या नंतर आता शिवसेना खासदारांचा गट फुटण्याच्या मार्गावर

नवी दिल्ली-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | विधानसभेत पक्षात उभी फूट पडून सत्तांतर झाल्यानंतर आता शिवसेनेचे खासदार फुटण्याच्या तयारीत असून मुख्यमंत्री शिंदे दिल्लीत असतांना याच्या हालचाली वेगवान झाल्या आहेत.

एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेचा आमदारांचा गट फुटल्याने महाविकास आघाडी सरकार कोसळले. यानंतरच्या नाट्यमय घटनांच्या नंतर राज्यात एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी अनुक्रमे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली असून या मंत्रीमंडळाचा लवकरच विस्तार होणार आहे. यानंतर कालपासून शिंदे आणि फडणवीस हे दिल्लीत दाखल झाले आहेत.

दरम्यान, मुख्यमंत्री शिंदे हे दिल्लीत असतांनाच शिवसेनेच्या १० खासदारांची गुप्त बैठक झाली असून यात आगामी राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत भाजपच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना पाठींबा देण्याचे ठरविण्यात आले. पक्षाचे रामटेकचे खासदार कृपाल  तुमाने यांच्या निवासस्थानी ही बैठक झाली असून यात १० खासदारांची उपस्थिती होती अशी माहिती समोर आली आहे. हे सर्व खासदार दुपारी एकनाथ शिंदे यांची भेट घेण्याची शक्यता आहे. यामुळे आता आमदारांच्या पाठोपाठ खासदारांमध्ये देखील फूट पडण्याचे स्पष्ट झाले आहे.

 

Protected Content