मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | विरोधी पक्षनेतेपदी अजित पवार यांची नियुक्ती करण्यासाठी जयंत पाटील यांनी विरोध दर्शविला होता अशी माहिती समोर आल्याने आता राष्ट्रवादीतही नाराजीनाट्य रंगणार का ? अशी चर्चा सुरू झाली आहे.
एकनाथ शिंदे यांची शिवसेनेत उभी फूट पाडून भाजपची सोबत घेतली. यामुळे शिवसेनेत आता दोन गट पडले आहेत. विधासभा सभापतींची निवड होतांना माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्यासह कॉंग्रेसचे काही आमदार मतदानाला न आल्यानेही राजकीय वर्तुळात चर्चा रंगली होती. या पाठोपाठ आता राष्ट्रवादीतही वाद असल्याचे वृत्त न्यूज-१८ लोकमत या वाहिनीने दिले आहे.
या वृत्तानुसार, अजित पवार यांची विरोधी पक्षनेतेपदी नियुक्त करण्याचे पत्र सभापतींना देण्यास प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी नकार दिला होता. यानंतर राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांनी दोनदा फोन करून पाटलांना आठवण करून दिली, की राष्ट्रवादीच्या ५३ पैकी ३६ आमदारांनी विरोधी पक्षनेते म्हणून अजित पवार यांना पाठिंबा देण्याच्या पत्रावर आधीच स्वाक्षरी केली आहे. यानंतरच जयंत पाटील यांनी पत्र दिल्याचे यात म्हटले आहे. पाटील यांनी याबाबत काही भाष्य केले नाही. तथापि, आपली विरोधी पक्षनेते बनण्याची इच्छा होती हे मात्र त्यांनी नमूद केल्याचे या वृत्तात म्हटले आहे.