मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । मध्यप्रदेशातून महाराष्ट्रात आलेल्या अवैध गुटख्याने भरलेले एक वाहन आज बोदवड तालुक्यातील पत्रकारांच्या सतर्कतेमुळे आज मुक्ताईनगर पोलिसांनी जप्त केले आहे. आमदार चंद्रकांत पाटील यांनी याच प्रकारे वाहन पकडल्यानंतर हा प्रकार घडल्याचा योगायोग चर्चेचा विषय बनला आहे.
मध्यप्रदेशात गुटखा सुरू असून महाराष्ट्रात बंदी असल्यामुळे तेथून महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात गुटख्याची तस्करी होत असून यासाठी बऱ्हाणपूर ते मुक्ताईनगर महामार्गाचा वापर करण्यात येत असल्याचे आजवरच्या अनेक कार्यवाहींमधून दिसून आले आहे. यात अनेक प्रकारचे गैरप्रकार होत असून ते वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. काही दिवसांपूर्वी पोलिसांनी गुटखा तस्कराचे वाहन पकडून ते परस्पर सोडून दिल्याच्या प्रकरणात पीएसआयसह चार पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबीत करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. यातच आज पुन्हा एक कारवाई झालेली आहे.
बोदवड तालुक्यातील पत्रकारांचा एक ग्रुप हा रावेर येथे आज जात असतांना समोरच्या बाजूने म्हणजेच बऱ्हाणपूरकरून एमएच15 एचएच 1088 या क्रमांकाचे बोलेरो पीकअप हे वाहन प्रचंड वेगाने जातांना त्यांना दिसून आले. यामुळे पत्रकारांना शंका वाटल्याने त्यांनी आपले वाहन वळवून या वाहनाचा पाठलाग केला. पुरनाड येथील चेकपोस्टच्या जवळ त्यांनी बोलेरोला गाठले असता यात त्यांना गुटखा असल्याचे आढळून आले.
दरम्यान, या संदर्भात मुक्ताईनगरचे उपविभागीय पोलीस अधिकारी राजकुमार शिंदे यांना या संदर्भात माहिती देण्यात आली. यावरून पोलिसांनी तात्काळ पुरनाड चेक पोस्टवर जाऊन बोलेरो पीकअप वाहन जप्त करून पोलीस स्थानकात आणले. या संदर्भात पोलिस प्रशासनाशी संपर्क केला असता त्यांनी या कारवाईला दुजोरा दिला असून याबाबत शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा मुक्ताईनगर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.
दरम्यान, आमदार चंद्रकांत पाटील यांनी काही दिवसांपूर्वीच गुटख्याने भरलेली कार स्वत: पकडून दिली होती. यानंतर आज पत्रकारांनी याच प्रकारे गुटखा तस्करी करणारे वाहन पकडून दिल्यामुळे परिसरात चर्चेला उधाण आले आहे.