जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील रायपूर गावातील बेपत्ता झालेल्या तरूणाचा खून करून मध्यप्रदेशातील जंगलात पूरल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. खून करणाऱ्या दोन संशयित आरोपींना अटक करण्यात पोलीसांना यश आले आहे. दोघांनी खून केल्याची कबुली दिली आहे.
भिकन श्यामसिंग परदेशी व विठ्ठल प्रेमसिंग परदेशी दोन्ही रा. रायपूर ता.जि.जळगाव असे अटक केलेल्या संशयित आरोपींचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, भुषण जयराम तळेले (वय-३४) रा. रायपूर ता. जि.जळगाव हा तरूण आपल्या पत्नी आशा यांच्यासह वास्तव्याला होता. चटईच्या कंपनीत काम करणाऱ्या भुषणला नवीन काम मिळवून देण्याचा बहाणा करुन भिकन परदेशी आणि विठ्ठल परदेशी या दोघांनी संगनमत करून १७ एप्रिल रोजी भूषणला दुचाकीवर बसवून भुसावळला घेऊन गेले. भुसावळात तिघे दारू पिल्यानंतर पुन्हा मुक्ताईनगर तेथे तीघे जण दारु प्यायले. त्यानंतर तिघे मध्यप्रदेशातील नेपानगर परिसरातील एका जंगलात गेले. तिथे भूषणच्या गुप्तांगावर मारहाण केली त्यानंतर दोरीने गळा आवळून खून केला. त्यानंतर मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी जवळ असलेल्या नाल्यात पुरला. त्यानंतर ते दुचाकीने रायपूर येथे आले. जसे काही घडलेच नाही असे राहू लागले. त्यानंतर संशयित आरोपींनी वेगवेगळ्या नंबरवरून भूषणच्या पत्नीला फोन करून वेगवेगळ्या गावांची नावे सांगून भुषण सोबत असल्याचे सांगीतले. त्यानंतर अनेक दिवस झाल्यानंतर पती घरी न असल्याने महिलेने पोलीसांकडे तक्रार दिली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा देखील दाखल करण्यात आला.
गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीसांनी तपासाची चक्रे फिरवून दोघांना ताब्यात घेतले. पोलीसांनी खाक्या दाखविताच दोघांनी भूषण खून करून जंगलात पुरल्याची कबुली दिली. त्यानुसार त्यांच्यावर वाढीव कलम लावण्यात आले. पोलीसांनी दोन्ही संशयितांसोबत घेवून नेपानगर परिसरातील जंगल गाठले. खून केल्याची घटना आणि भूषणचा मृतदेह पुरल्याची जागा देखील दाखविली. भूषणचा पुरलेला मृतदेह बाहेर काढताच कुटुंबियांनी एकच आक्रोश केला होता. भूषणचा खून का करण्यात आला याची कसून चौकशी सुरू आहे.