Home धर्म-समाज २० वर्षांनंतर दिपनगरच्या श्री शारदा विद्यालयात माजी विद्यार्थ्यांचा स्नेहसंमेलन सोहळा

२० वर्षांनंतर दिपनगरच्या श्री शारदा विद्यालयात माजी विद्यार्थ्यांचा स्नेहसंमेलन सोहळा


भुसावळ,लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । शालेय जीवनातील गोड आठवणींना उजाळा देणारा आणि जुने मित्र-मैत्रिणींना पुन्हा एकत्र आणणारा एक भावनिक क्षण श्री शारदा माध्यमिक विद्यालय, दिपनगर येथे अनुभवायला मिळाला. वर्ष 2004-05 च्या इयत्ता 10 वीच्या माजी विद्यार्थ्यांचा तब्बल 20 वर्षानंतरचा स्नेहसंमेलन सोहळा दिनांक 26 ऑक्टोबर 2025 रोजी शाळेच्या प्रांगणात अत्यंत उत्साहपूर्ण आणि आनंदमय वातावरणात पार पडला.

या विशेष स्नेहसंमेलनात माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे अध्यक्ष श्री प्रल्हाद कवठे उपस्थित होते. त्यांच्यासह शाळेचे माजी मुख्याध्यापक, माजी शिक्षक आणि विद्यमान शिक्षकवृंद यांचीही उपस्थिती सोहळ्याला औचित्यपूर्ण ठरली. कार्यक्रमाचे आयोजन आणि नियोजन शाळेचे मुख्याध्यापक जे. बी. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.

कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती मातेच्या पूजनाने आणि दीपप्रज्वलनाने झाली. त्यानंतर हुतात्मा स्तंभाला पुष्पांजली अर्पण करून कार्यक्रमाची पुढील सांगता करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन गणेश मंगळकर यांनी केले, तर आभार वैशाली पाटील यांनी मानले.

स्नेहसंमेलनात माजी विद्यार्थ्यांमधील हर्षला पाटील, स्वाती भिरुड, कल्पिता तायडे, पंकज वाणी, स्वप्नील निकम, प्रतीक भावसार, राहुल बोरोले, भरत तायडे आणि हितेश सरोदे यांनी आपल्या शालेय जीवनातील अनुभव, आठवणी आणि विनोदी प्रसंग सर्वांसमोर शेअर केले. जुन्या आठवणींच्या गप्पांमुळे वातावरण भावूक झाले होते.

कार्यक्रमात सर्व माजी विद्यार्थ्यांना स्मृतिचिन्ह म्हणून भेटवस्तू देण्यात आली. या आयोजनात भूषण सोनवणे, मयूर बोरोले, दशरथ पाटील, दीपमाला रोटे, चेतना तायडे, शशांक किरंगे, शेख रफीक आणि भगवान तायडे यांनी मोलाची भूमिका बजावली.

या स्नेहसंमेलनामुळे जुने सहाध्यायी पुन्हा भेटल्याचा आनंद सर्वांच्या चेहऱ्यावर झळकत होता. २० वर्षांपूर्वीच्या शालेय आठवणींना नवसंजीवनी मिळाल्याचा अनुभव सर्वांना आला. कार्यक्रमाच्या शेवटी पुढील वर्षीही अशाच भव्य स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्याचा निर्धार सर्वांनी व्यक्त केला.


Protected Content

Play sound